breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

भाजप आमदारांचा राजीनाम्याचा सूर…

  • बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी 

मुंबई – मराठा आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी आता राजकिय पक्षांमध्येही अहमिका लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कॉंग्रेसपाठोपाठ भाजपमध्येही आमदारांनी राजीनाम्याचा सूर आळवला आहे. मराठा समाजाला आरक्षण कधी देणार ते सांगा, अन्यथा आम्हालाही राजीनामा द्यावा लागेल, असा इशारा आमदारांनी दिला आहे. मात्र, असा कोणत्याही आमदारांनी राजीनामा पक्षाकडे दिला नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात उमटलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर भाजप आमदारांची मते विचारात घेण्यासाठी आज मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या आमदारांकडून राज्यातील सद्यपरिस्थती जाणून घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात भाजपच्या विरोधात नाराजी असल्याचा सूर काही आमदारांनी अप्रत्यक्षपणे लावला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या एका आमदाराने राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, असे एका आमदाराने पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आमदाराच्या राजीनाम्याची बाब फेटाळून लावली.

भाजपच्या कोणत्याही आमदाराने पक्षाकडे राजीनामा देऊ केलेला नाही असे तावडे यांनी स्पष्ट केले. सरकारच्या योजना आमदारांच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारने मराठा समाजासाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी मदत केंद्रे सुरु करणार आहोत. भाजपचे सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या आहेत, असे तावडे म्हणाले.

न्यायालयात टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला दिले जाईल हे लोकांपर्यंत पोहोचवा असेही मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले आहे. मराठा समाजासाठी दिलेल्या सरकारच्या सर्व योजना आमदारांच्या माध्यमातून राज्यात पोहोचवल्या जातील, असे तावडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button