breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बांधकाम साईटसह कामगार वसाहतीत सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’ बसवा – महापाैर जाधव

  • महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना आदेश काढण्याच्या सुचना 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात बिल्डरांच्या बांधकाम साईट, कामगार वसाहतीत सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. तेथील कामगारांसह त्याच्या मुलांची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व बिल्डरांना त्याच्या साईटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करावी, असे आदेश महापाैर राहूल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले आहेत.

महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज (गुरुवारी) आयोजित केली होती. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. महापालिका सर्वसाधारण सभेत शहरातील अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्येचे पडसाद पडले. यावेळी सर्वपक्षीय नगरसेविकांनी शहरातील मुली, महिलांच्या सुरक्षिततेकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

याप्रसंगी माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या की, शहरात अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत. मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. नराधमांवर कडक कारवाई करण्यात यावी. शहरात अनेक ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले नाहीत. जिथे कॅमेरे नसतील, तिथे तातडीने ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. त्यामुळे आरोपी शोधण्यास मदत होईल. फुटेज पोलिसांना देण्यात यावे, अशी मागणीही कदम यांनी केली.

भाजपच्या झामाबाई बारणे म्हणाल्या, बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. माई ढोरे म्हणाल्या, महापालिका इमारतीच्या पाठीमागे खून होत आहे. बलात्कार, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल काटे म्हणाल्या, स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेल्या पिंपळेगुरवमध्ये मुली, महिला सुरक्षित नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. पोलिसांवर वचक निर्माण करा. कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांशी बैठक घेण्यात यावी. शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, मुली, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, दोन वर्षाच्या चिमुरडीवर झालेली बलात्काराची घटना अत्यंत दुर्देवी आहे. विकृती संपविणे गरजेचे आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येत आहेत. उर्वरित ठिकाणी देखील कॅमेरे बसविण्यात यावेत.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत लवकरच पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाईल. त्यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली जाईल. शहरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. त्यानुसार शहरात सर्वत्र कॅमेरे बसविले जातील. तसेच लेबर कॅम्पवरील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावे. असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button