breaking-newsपुणेमहाराष्ट्र

बालकांमधील विषाणू संसर्ग वाढला

दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळपासून वाढणारी थंडी अशा विषम वातावरणामुळे लहान मुलांमधील विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. स्वाइन फ्लू आणि डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर विषाणूजन्य आजाराची लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

शहरातील थंडीचा लांबलेला मुक्काम आणि त्यामुळे झालेले विषम हवामान यांमुळे शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये यंदाच्या वर्षी मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारी महिन्यापासून शहरात स्वाइन फ्लूने पुन्हा आपले हात पाय पसरण्यास सुरुवात केली असून  बालकांमध्ये विषाणू संसर्गाचे (व्हायरल आजार) प्रमाण वाढल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्टरांकडून मांडण्यात येत आहे.

कोथरुड येथील जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने म्हणाले, लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना विषाणू संसर्ग लवकर होतो. सध्याच्या वातावरणात मोठय़ा माणसांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरू करावे. दहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांमध्ये हा संसर्ग दिसून येत आहे. त्यांच्यामार्फत इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मुलांना संपूर्ण बरे वाटेपर्यंत शाळेत पाठवू नये.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास पालकांनी घाबरून न जाता मुलांना जास्तीत जास्त विश्रांती आणि पोषक आहार मिळेल याची काळजी घ्यावी. घरातील औषधे मनाने न देता डॉक्टरांना भेटावे. त्यामुळे साथीच्या वातावरणात दुखण्याचे योग्य निदान होऊ शकेल. बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, लहान मुलांमधील विषाणू संसर्ग आणि डायरिया यांचे प्रमाण भरपूर आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. वारंवार हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. मुलांनी भरपूर पाणी पिणे आणि समतोल आहार घेणे आवश्यक आहे. संसर्गाच्या काळात मुलांना शाळेत न पाठवता संपूर्ण विश्रांती मिळेल असे पाहावे.

पुणे शहरात स्वाइन फ्लूचे बावीस रुग्ण

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून शहरातील स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या बावीस झाली आहे. त्यांपैकी अकरा रुग्ण विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. आठ रुग्ण वॉर्डमध्ये तर तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण पाच रुग्णांना संपूर्ण उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button