breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

बारामतीत बालविवाह जोमात, नवरदेवाच्या कुटुंबियांची वरात पोलीस ठाण्याच्या दारात

पुणे / महाईन्यूज

बारामतीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या सतर्कतेमुळे डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे आज (ता. ३०) होणारा बालविवाह रोखण्यात आला. कायद्याची ऐशी की तैशी करून बालविवाह करणा-या कुटुंबियांची वरात पोलीस ठाण्याच्या दारात निघाल्याने समाजातील अशा विकृत मानसिकतेला धक्का बसला आहे.

डोर्लेवाडी येथे भटकंती करून उदरनिर्वाह करणारा वैदू समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजात शिक्षणाचा अभाव व जुन्या रूढी परंपरा, चालीरीतीचा पगडा अजूनही कायम असल्याने बालविवाह सारख्या प्रथा या समाजात घडत आहेत.

याबाबत स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक संस्थांनी अनेक वेळा प्रबोधन, जागृती करूनही या समाजात म्हणावा तेवढा बदल झाल्याचे दिसून येत नाही. आज येथील निंबाळकर कुटुंबाच्या मुलीशी केडगाव (ता. दौंड)  येथील शिंदे कुटुंबाच्या मुलाबरोबर डोर्लेवाडी येथे विवाह समारंभ होणार होता.

मंडप, वाजंत्री, जेवण अशी सर्व तयारीही झाली होती. मात्र विवाह होणारी मुलगी अल्पवयीन असल्याबाबतची माहिती लग्न पत्रिका व मुलीचा फोटो तहसीलदार बारामती यांना कोणीतरी दिल्याने त्यांनी बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने सकाळी एक पथक विवाहस्थळी पाठवून मुलीच्या वयाची खातरजमा केली. मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुला-मुलीचे आई-वडील यांना बारामती शहर पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले.

अल्पवयीन विवाहबाबत होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली. शिवाय अल्पवयीन बालविवाह केल्यामुळे मुला-मुलींच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबाबत जागृतीही केल्याने हा विवाह दोन्ही परिवारांकडून थांबवण्यात आला. बारामती शहर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करून दोन्ही परिवारांना सोडण्यात आले.

आपण २१ व्या शतकात वावरत असताना अजूनही काही समाजात जुन्या चालीरीती, रूढी परंपरा सुरू आहेत. याबाबत खंत वाटते. यापुढे बालविवाह जात पंचायत यासारख्या घटना बारामती तालुक्यात खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा घटनांना जे बाहेरून खतपाणी घालतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button