breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘फ्लोरा फाऊंटन’चे पुन्हा थुईथुई नृत्य

मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या वास्तूचे गुरुवारी लोकार्पण सोहळा

एकेकाळी देश-विदेशी पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या मुंबईतील ‘फ्लोरा फाऊंटन’च्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘फ्लोरा फाऊंटन’वर अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. गुरुवार, २४ जानेवारी रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या ‘फ्लोरा फाऊंटन’ची कारंजी पुन्हा एकदा पर्यटकांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहता येणार आहेत.

ब्रिटिशांनी १८६४ मध्ये ‘फ्लोरा फाऊंटन’ उभारले होते. वास्तुविशारद नरिमन शॉ यांनी तयार केलेल्या आराखडय़ानुसार ‘पोर्ट लॅण्ड’ दगडापासून ‘फ्लोरा फाऊंटन’ उभारण्यात आले. कारंजी आणि त्यावरील भागात रोमन देवता असे त्याचे स्वरूप होते. त्याचबरोबर कारंजीच्या चारही बाजूला भारतीय उद्योगधंदे, झाडे, फळे, धान्य यांच्या प्रतिकृतीसह युवतींच्या पुतळ्याचा समावेश होता. ब्रिटिश भारतातून गेल्यानंतरही ही वास्तू मुंबईत अस्तित्व टिकवून होती. मात्र यंत्रणांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि देखभालीअभावी ‘फ्लोरा फाऊंटन’वर शेवाळे साचले होते. त्यामुळे २००५ मध्ये या वास्तूची स्वच्छता करण्यात आली. दरम्यानच्या काळात २००७ मध्ये कारंजी बंद पडली आणि या वास्तूची दुरवस्था होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेत पालिकेने या वास्तूची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला.

‘नुतनीकरणातही पुरातनता जपलीय’

दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात वास्तूच्या आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण आणि दुसऱ्या टप्प्यात ‘फ्लोरा फाऊंटन’ची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचे निश्चित झाले. प्रत्यक्षात या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. पालिकेने पहिल्या टप्प्यातील कामासाठी कंत्राटदाराची, तर दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अ‍ॅण्ड कल्चरल हेरिटेज (इंटेक)ची नियुक्ती केली होती. दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली असून वास्तूवर अखेरचा हात फिरविण्यात येत आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ही वास्तू पुरातनवास्तू दिसावी, अशा दृष्टीने तिचे नूतनीकरण करण्यात आले असून येत्या गुरुवारी, २४ जानेवारी रोजी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button