breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काँग्रेस शिवसेनेच्या मदतीने राणेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; बालेकिल्ल्यातच भाजपा गमावणार सत्ता?

मुंबई |

कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येण्याची चिन्हं दिसत आहेत. आज काँग्रेस जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीनंतर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती जिल्हा कार्यकारिणी बैठकीनंतर जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी दिलीय.

आज कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारणी बैठकीत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत झाली चर्चा. शिवसेनेने नगराध्यक्ष पद देऊ केल्यास सत्तेत सहभागी होणार असल्याचं देशमुख म्हणाले. तसेच या बैठकीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेसोबत जाण्याच्या बाजूने मत व्यक्त केल्याने शिवसेना आणि काँग्रेस युती जवळजवळ निश्चित मानली जात आहे. मात्र असं घडल्यास हा राणेंसाठी फार मोठा धक्का ठरणार आहे. मात्र आता शिवसेना काँग्रेससाठी नगराध्यक्ष पद सोडणार का याबद्दलच्या वाटाघाडी अद्याप बाकी असल्याने शिवसेना काय भूमिका घेते यावर सत्तास्थापनेची अंतिम गणितं ठरणार आहेत.

कुडाळ नगरपंचायतीत भाजपा आठ, शिवसेना सात तर कॉंग्रेसकडे दोन नगरसेवक आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला एका नगरसेवकाची गरज आहे तर शिवसेनेला दोन नगरसेवकांची गरज आहे. मात्र आजच्या बैठकीमध्ये कॉंग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित केल्याने सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि तेथील चार नगरपंचायती हा नारायण राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत काँग्रेसने कुडाळ नगरपंचायतीत पुन्हा सत्तेत बसण्याचे भाजपाचे मनसुबे उधळलेत. कॉंग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आल्यामुळे कुडाळमध्ये कॉंग्रेस किंग मेकरच्या भुमिकेत दिसत आहे.

माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच कुडाळ असो किंवा देवगड असो शक्यतो इथे आमचाच नगराध्यक्ष बसेल असं म्हटलं होतं. “कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष ठरला असून आमदार वैभव नाईक यांना कंटाळून नागरिकांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. सत्ता आमचीच असली असती मात्र आमची एक जागा एका मताने गेल्याने आम्ही आठ जागांवर विजयी झालो,” असं निलेश राणे म्हणाले. “आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने सर्वात आधी सत्ता स्थापनेची संधी आम्हाला मिळणार. समोरुन कोणी आलं तर आम्ही कशाला नाय म्हणू?”, असा प्रतिप्रश्न निलेश राणेंनी आकड्यांची जुळवाजुळव करण्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना विचारला.

काँग्रेसचं कोणी तुमच्यासोबत आलं तर असं विचारलं असता, “काँग्रेसचेच कशाला, शिवसेनेचेही येतील. मोठा पक्ष म्हणून आम्हाला आधी सत्ता स्थापनेचा अधिकार आहे. कोणी बिचारे समोरुन आले तर आम्ही त्यांना का नाय म्हणू? इथे आमदाराच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह आहे. त्यांना आमदारच नकोय. त्यांना आमदाराच्या अंतर्गत कामच करायचं नाही. ते या शहराचं वाटोळं करतील असं वाटत असेल आणि आम्ही चांगलं काम करणार असं वाटतं असेल तर सत्ता स्थापन होईल आमची,” असं निलेश राणेंनी शिवसेनेच्या स्थानिक आमदारांवर निशाणा साधताना म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button