breaking-newsमहाराष्ट्र

प्रिती बारिया हत्या प्रकरणातील दोन्ही दोषींना फाशी

भंडारा : भंडाऱ्यातील बहुचर्चित प्रिती बारिया हत्या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भंडारा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी हा निकाल दिला.

एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश घुसून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात प्रिती बारिया यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोन मुलांना कायमचे अपंगत्व आले. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 30 जुलै 2015 रोजी ही घटना घडली होती. दुपारी दोनच्या सुमारास म्हाडा कॉलनीमधील रवींद्र शिंदे यांच्या घरी, त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून, आमीर आणि सचिन एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसले. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने हल्ला करुन घरातील दागिने, लॅपटॉप, एटीएम कार्ड चोरले. या घटनेत अश्विनीला कायमचे अपंगत्व आले होते.

यानंतर आरोपींनी याच दिवशी रात्री आठच्या सुमारास तकिया वॉर्डातील रुपेश बारिया यांच्या घरीही एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला. आरोपींनी रुपेश यांच्या पत्नी प्रिती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार करुन हत्या केली. यावेळी त्यांचा मुलगा भव्य बारिया समोर आला असता, त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले, त्यात तो गंभीर जखमी झाला. बारिया यांच्या घरातून सोनं-चांदीचे दागिने आणि 3 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरली.

आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी रवींद्र शिंदेंच्या घरातून चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन लोकेशन शोधून पोलिसांनी या दोघांना अटक करुन, पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 26 साक्षीदार आणि जप्त केलेल्या हातोडीच्या आधारे दोघांना दोषी ठरवण्यात आले. अखेर आज या खटल्यावर अंतिम सुनावणी करताना, जिल्हा न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button