breaking-newsराष्ट्रिय

पूलवामात जवान शहीद होत असताना मोदी चित्रीकरणात मश्गूल- राहुल गांधी

‘मै भी चौकीदार’ प्रतिज्ञा घेण्याचे मोदींचे समर्थकांना आवाहन

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुलवामा प्रकरणावरून जोरदार हल्ला चढविला. पुलवामामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झाले त्या वेळी मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये कॅमेऱ्यासमोर चित्रीकरणात मश्गूल होते, असा आरोप गांधी यांनी केला.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी उत्तराखंडमध्ये पक्षाच्या प्रचाराची सुरुवात गांधी यांनी केली. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास गरिबांसाठी किमान मिळकत हमी योजना सुरू करण्यात येईल, असे गांधी यांनी जाहीर केले.

पुलवामामध्ये हल्ला होताच आम्ही सरकार आणि देशासोबत असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. आपण सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले. मात्र जवान शहीद होत असताना मोदी काय करीत होते ते प्रत्येकाला माहिती आहे. मोदी नॅशनल जिओग्राफिक डॉक्युमेण्टरीसाठी कॅमेऱ्यासमोर उभे राहून चित्रीकरण करण्यात मश्गूल होते, असे गांधी येथे एका जाहीर सभेत म्हणाले. पुलवामासारखा हल्ला होत असल्याच्या दिवशी मोदी साडेतीन तास चित्रीकरण करीत होते आणि तरीही ते देशभक्तीबद्दल बोलत आहेत, असेही गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या समर्थकांना ‘मै भी चौकीदार’ अशी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले. भ्रष्टाचार आणि सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढाईमध्ये आपण एकटेच नसल्याचेही ते म्हणाले.

तुमचा चौकीदार ठामपणे उभा असून देशाची सेवा करीत आहे, परंतु आपण एकटे नाहीत, जो भ्रष्टाचार, सामाजिक विषमतेविरुद्ध लढत आहे तो प्रत्येक जण चौकीदार आहे, भारताच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे, आजमितीला प्रत्येक भारतीय मै भी चौकीदार, असे म्हणत आहे, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे.

मोदी स्वत:चा उल्लेख चौकीदार असा करतात, हा चौकीदार भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही, असेही ते म्हणतात. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदी यांच्यावर चौकीदार चोर है असल्याचा नेहमीच आरोप करतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button