breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत ‘मदतीला कमी अन्‌ पंगतीला आम्ही’वाल्यांची मोर्चेबांधणी?

पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा उंचावल्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

पिंपरी। महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील (२०१७) पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता राज्यात किंवा महापालिकेत सत्तेत येणारच नाही, असा अंदाज बांधून सोयीची भूमिका घेणारे आणि भाजपला छुपी मदत करणारे अनेकजण आता पक्ष राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर ‘पंगतीला’ आले आहे. त्यामुळे पक्ष संकटात आणि संघर्षात असताना ‘कातडी बचाओ’ भूमिका घेणारे कथित नेते, पदाधिकारी आता महामंडळ, विधान परिषद अशा आशा बाळगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावताना दिसत आहेत, अशा भावना राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांमधून बोलून दाखवल्या जात आहेत.

          वास्तविक, मी-मी म्हणणाऱ्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्या-त्या वेळी सोयीची राजकीय भूमिका घेतली. काहींनी भाजपशी जुळते घेतले. तर काहींनी विधानसभा निवडणुकीत तिकीटही नाकारले. याबाबत मध्यंतरी झालेल्या एका हॉटेलमधील बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काहींनी महापालिका निवडणुकांपूर्वी (२०१७) पक्षाची साथ सोडली. काहींनी महापालिका निवडणुकीत बंडखोरीही केली. पण, काळाचा महिमा अगाध असतो. पक्षाला सुगीचे दिवस आले तसे राजकीय लाभासाठी ‘पंगतीला’ अनेकजण सरसावले. यापूर्वी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या आंदोलनाला पिंपरी चौकात ३७ नगरसेवकांपैकी चार-पाच नगरसेवकही उपस्थित राहत नव्‍हते, ही वस्तुस्थिती आहे.

          राज्यातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचे मनसुबे उधळून लावले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील काठावर बसलेले ‘कथित नेते आणि निष्ठावंत’ जागे झाले. पण, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये खदखद व्यक्त होताना दिसते.

          वास्तविक, प्रत्येक नेता किंवा पदाधिकारी आपआपल्या परीने पक्ष अथवा संघटनेचे काम करीत असतो. पण, त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत असेल, तर प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी संपली…आता काही खरे नाही…म्हणून राजकीय सोयीची भूमिका घेणाऱ्यांकडे संयम आणि निष्ठेचा अभाव दिसत होता, असाच अर्थ होतो. तरीही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी शहरातील अधिकाधिक इच्छुकांना महामंडळ, विधान परिषद अथवा अन्य लाभाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळावी. तसेच, पक्षाची संघटना मजबूत होण्याबाबत प्रत्येकाने सक्रीय व्‍हावे, अशी माफक अपेक्षा कट्टर कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसते.

****

कुणाची ‘फिल्डिंग’ आणि कोणत्या पदासाठी?

पक्ष सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा उंचावली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपआपल्या परीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मोर्चेबांधणी केली आहे. त्याची समाजमाध्यमांमधून आणि कार्यकर्त्यांमधून चर्चा होताना दिसते. तसेच, काही अजित पवारांच्या निवडीनंतर शहरात काहीठिकाणी फ्लेक्सही लावले आहेत. त्या-त्या नेत्याची-पदाधिकाऱ्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा खालीलप्रमाणे असल्याची चर्चा आहे.

  • विलास लांडे, माजी आमदार :

विधान परिषद अथवा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद.

  • संजोग वाघेरे, विद्यमान शहराध्यक्ष :

विधान परिषद अथवा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद.

  • भाउसाहेब भोईर, स्वीकृत नगरसेवक :

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद.

  • आझमभाई पानसरे, माजी महापौर :

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद. किंवा अन्य.

  • विठ्ठल उर्फ नाना काटे, विद्यमान विरोधी पक्षनेते :

राज्यस्तरावरील महामंडळाचे अध्यक्षपद किंवा अन्य.

  • दत्ताकाका साने, माजी विरोधी पक्षनेते :

राज्यस्तरावरील महामंडळाचे अध्यक्षपद किंवा अन्य.

  • मोरेश्वर भोंडवे, स्थायी समिती सदस्य :

राज्यस्तरावरील महामंडळाचे अध्यक्षपद किंवा अन्य.

  • राजू मिसाळ, नगरसेवक :

राज्यस्तरावरील महामंडळाचे अध्यक्षपद किंवा अन्य.

  • मयूर कलाटे, स्थायी समिती सदस्य :

विधान परिषदेवर वर्णी लावण्याबाबत आग्रही

  • अजित गव्‍हाणे, नगरसेवक :

महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदी वर्णी लावण्याची अपेक्षा.

  • वैशाली घोडेकर, नगसेविका :

महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदी वर्णी लावण्याची अपेक्षा.

  • मंगला कदम, नगसेविका :

राज्य महिला आघाडीच्या प्रमुख पदावर काम करण्याची अपेक्षा.

अशाप्रकारे अनेकांनी आपआपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पक्षश्रेष्ठींसमोर ठेवल्या आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे. राजकीय अपेक्षा असणे यात गैर काहीच नाही. पण, आता पिंपरी-चिंचवडमधून कुणाला आणि कोणती संधी मिळणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button