पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे निधन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय 47) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
दत्ता साने यांच्या मागे आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा यश, 16 वर्षीय कन्या तसेच दोन भाऊ व मोठा परिवार आहे. साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. ‘दत्ताकाका’ या नावाने चिखली परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात परिचित होते.
25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.