breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये ‘विशेष बाल पोलिस पथका’ची स्थापना

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या अल्पवयीन मुलांना वेळीच सकारात्मक दिशा देणे आवश्यक आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा शोधून त्याद्वारे त्या बालकांना दिशा देण्यासाठी गरज असून, यासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ‘विशेष बाल पोलिस पथका’ची स्थापना करण्यात आल्याची माहिती आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली. या पथकाची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच ऑटो क्लस्टर येथे पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते झाले. या वेळी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष बाल पथकातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथील बाल न्याय प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जैद सय्यद, बाल सुरक्षा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते विजय बावीस्कर, मोरवाडी प्रथमवर्ग न्यायालयातील अॅड. मोरे आदींनी उपस्थितांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर ‘विशेष बाल पोलिस पथक’ स्थापन करण्यात आले आहे. पोलिस स्टेशन स्तरावरील या पथकामध्ये एक पोलिस अधिकारी आणि किमान तीन पोलिस कर्मचारी असणार आहेत. या पथकांचे नियंत्रण प्रमुख म्हणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या पथकांची एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये आयुक्तालयातील १५ पोलिस अधिकारी आणि ४५ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

आयुक्त बिष्णोई म्हणाले, ‘एक पोलिस म्हणून आपल्या सर्वांना समाजाचे ऋण फेडण्याची संधी मिळाली आहे. पोलिस स्टेशन स्तरावर नव्हे तर समाजातील इतर ठिकाणीदेखील बालकांच्या मदतीस तत्पर असा आपला दृष्टिकोन असायला हवा. या पथकात काम करीत असताना एखाद्या बालकासदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करून त्याला सकारात्मक ऊर्जा देता आली, तर ती आपल्या जीवनातील सर्वात मोठी संधी असेल. नजरचुकीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संपर्कात आलेली झोपडपट्टी परिसरातील व व्यसनाधीनतेकडे वळलेल्या बालकांचे या पथकाने समुपदेशन करावे. सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करावे. रोजगार मेळाव्यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करून अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे.’ सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निरीक्षक सुधाकर काटे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button