breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पालिकेला जलबचतीचा सल्ला

प्रक्रिया केलेले पाणी उचलण्यात जलसंपदा विभागाची उदासीनता, पण..

पुणे : महापालिकेला पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला देणाऱ्या जलसंपदा विभागाला मुंढवा जॅकवेल प्रकल्पात प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी उचलण्याचे वावडे असल्याची वस्तुस्थिती पुढे आले आहे. मुंढवा प्रकल्पातून प्रतिदिन ५१५ दशलक्ष लिटर पाणी उचलणे अपेक्षित असताना गेल्या २२ दिवसात प्रतिदिन सरासरी फक्त ३७० दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाने घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. जलसंपदा विभाग मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलत नसल्याच्या आरोपांनाही यामुळे पुष्टी मिळाली आहे.

महापालिका मंजूर कोटय़ापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याचा ठपका पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाकडून सातत्याने ठेवला जातो. त्यातच खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठय़ात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे सांगत पुणेकरांच्या माथी पाणीकपात मारण्यात आली आहे. दररोज दोन वेळ पाणीपुरवठा करण्याठी १३५० दशलक्ष लिटर पाणी महापालिका घेत होती. त्याऐवजी ११५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभागच धरणातील पाण्याचा अपव्यय करीत असल्याची बाब पुढे आली आहे.

ग्रामीण भागातील शेतीसाठी प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने १०० कोटी रुपये खर्च करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पातून ६.५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सिंचनासाठी महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दररोज ५१५ दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाला सिंचनासाठी उचलता येणे शक्य आहे. मात्र  एक ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सरासरी ३७० दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाने उचलले असल्याची बाब पुढे आली आहे. कालवा फुटी प्रकरणानंतर कालव्यातून पाणी सोडण्यात आले नसतानाही मुंढवा जॅकवेलमधून पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतीसाठी नक्की किती पाण्याची आवश्यकता आहे, असाही प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

सहा महिन्यांच्या कालावधीत सरासरी प्रतिदिन १४० दशलक्ष लिटर पाणी जलसंपदा विभागाने सिंचनासाठी उचलले आहे. ज्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यात शून्य, नोव्हेंबर महिन्यात १० तर डिसेंबर महिन्यात ६४ दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असतानाही १० डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ या कालावधीत खडकवासला धरणातून सिंचनासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा प्रताप केल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून यापूर्वीही स्पष्ट झाली आहे. प्रकल्पातून पाणी घेण्याऐवजी शेतीच्या नावाखाली धरणातूनच पाणी सोडण्यात येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

शेतीसाठी जी आवर्तने नियोजित केली आहेत, त्यामध्ये दिवसाला २०० दशलक्ष मीटर अशी कपात आवश्यक आहे. शेतीसाठी तेवढय़ा पाण्याची आवश्यकता नसून गरज असेल तर मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून हे पाणी उचलता येणार आहे. त्यामुळे प्रतिदिन वाचलेले २०० दशलक्ष लिटर पाणी पुण्यासाठी मिळाले तर पाणीकपातीची वेळ येणार नाही.

– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button