breaking-newsमहाराष्ट्र

पहाटे धुके, दिवसा कडक ऊन!

सांगली परिसरात द्राक्ष फळछाटणीची कामे रेंगाळली

पहाटे धुक्याच्या दुलईमुळे थंडी, दुपारी ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव देणारे कडक ऊन असा विचित्र अनुभव गेल्या चार दिवसांपासून सांगलीकरांना मिळत असून यामुळे द्राक्षाच्या फळछाटणीची कामे रेंगाळली आहेत. आटपाडी, जत तालुक्यात हंगामात अल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने भासत असून आता परतीच्या मान्सूनचीच प्रतीक्षा आहे.

शहरासह जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात गेले दोन दिवस पहाटे ते सकाळी ८ या काळात धुक्याची चादर पसरल्यासारखे दिसते. निसर्गाची वेगवेगळी रूपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत. पहाटेपासून पसरणाऱ्या धुक्यामुळे हवेतील तपमान २० अंशांपर्यंत खाली येत असून सकाळी नऊ वाजल्यानंतर तपमान वाढत जाउन सायंकाळी तीन वाजता ३३ अंश सेल्सियसपर्यंत बुधवारी पोहोचले होते. प्रतितास ९ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असून यामुळे ऑक्टोबर हीटची अनुभूती येत आहे.

मिरज तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापासून आगाप द्राक्ष फळछाटणी करण्यात येते. हंगामपूर्व फळ छाटणी केल्यामुळे द्राक्षाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा असते. मात्र, दाट धुक्यामुळे कोवळ्या फुटीवर तातडीने बुरशीजन्य रोगांचे आक्रमण होत असल्याने अद्याप छाटणीच्या कामांना प्रारंभ करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

तालुक्यातील बेळंकी, कदमवाडी, चाबूकस्वारवाडी, सलगरे, खंडेराजुरी परिसरात आगाप फळछाटणी प्रामुख्याने घेतली जाते. पाणथळ भाग, ओढाकाठ आदी ठिकाणी धुक्याचे प्रमाण जादा असून हे धुके पाणीदार असल्याने नजीकच्या काळात पावसाची लक्षणे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी भागात यंदाच्या हंगामात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अद्याप ओढे-नाले कोरडेच आहेत. विहिरीनी या वर्षांच्या प्रारंभीच्या काळात तळ गाठलेला असून अद्याप पाझर फुटले नसल्याने आता परतीच्या मान्सूनवरच आस राहिली आहे. विहिरीनी तळ गाठला असल्याने जत तालुक्याच्या पूर्व भाग आणि आटपाडी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने भासू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button