breaking-newsराष्ट्रिय

पवार यांनी मोदींना क्‍लीन चिट दिल्याचे वृत्त खोटे – कॉंग्रेस

नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट दिल्याचे वृत्त खोटे असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. विरोधकांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला.

विरोधकांनी आणि विशेषत: कॉंग्रेसने राफेलवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. त्यामुळे मोदी सरकारची कोंडी झाल्याचे चित्र असतानाच पवार यांच्या कथित क्‍लीन चिटवरून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. खुद्द राष्ट्रवादीतच त्यामुळे वादळ निर्माण होऊन ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पक्षाला रामराम ठोकला. यापार्श्‍वभूूमीवर, पुढे आलेल्या कॉंग्रेसने पवार यांनी मोदींना क्‍लीन चिट दिल्याचे नाकारले.

यासंदर्भात बोलताना कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचे नमूद केले. क्‍लीन चिट देणारे कुठले वक्तव्य केले नाही. उलट, राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) मार्फत चौकशी करण्याच्या मागणीस राष्ट्रवादी अनुकूल असल्याचे पवार यांनी स्पष्ट केल्याचे सुर्जेवाला म्हणाले. राष्ट्रवादीनेही पवार यांनी क्‍लीन चिट दिल्याचे नाकारताना सरकारने राफेल विमानांची किंमत जाहीर करावी, या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.
पवार यांनी तीन प्रश्‍न उपस्थित केले-सुप्रिया सुळे

पवार यांच्या कथित क्‍लीन चिटवरून राजकीय चर्चांना तोंड फुटले असतानाच त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे सरसावल्या. पवार यांचे म्हणणे योग्यरित्या समजून घेतले गेले नाही. त्यांनी तीन प्रश्‍न उपस्थित केले. विमानांची किंमत 300 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे समर्थन कसे करणार? शंका उपस्थित केली जात असेल तर जेपीसीमार्फत चौकशी का केली जात नाही? बोफोर्स प्रकरणी भाजपने किंमतीचा मुद्दा उपस्थित केला. मग, आता तो पक्ष गोपनीयतेचे कारण का पुढे करत आहे, अशा आशयाचे ते प्रश्‍न असल्याचे ट्विट सुप्रिया यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button