breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘पर्वती’वरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी की काँग्रेसची ताकद मोठी, या मुद्यावरून पर्वती विधानसभा मतदार संघात हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. महापालिका निवडणुकीतील कामगिरी आणि सन २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदार संघावर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. तर कार्यकर्त्यांचे जाळे आणि यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेले यश पाहता पर्वती मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. एकीकडे आघाडीमधील दोन्ही पक्ष आमने-सामने आलेले आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमध्ये शिवसेना या मतदार संघावर दावा करण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येत आहे.

सन २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वबळावर लढले. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातही युती न झाल्यामुळे भाजप-शिवेसना हे पक्षही स्वतंत्ररीत्या लढले. त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच या मतदार संघात लढत झाली. भाजपच्या माधुरी मिसाळ पर्वती मतदारसंघामधून विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचा उमेदवार चौथ्या स्थानावर राहिला.

त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचे दिसले नाही. या मतदारसंघातील २६ नगरसेवकांपैकी २२ नगसेवक भाजपचे असून काँग्रेसचा आणि शिवसेनेचा एक, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक या मतदार संघात आहेत.  मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे हे चित्र असले तरी जुन्या निवडणुकांचा दाखला देत आघाडीतील पदाधिकारी आमने-सामने आले असून मतदारसंघ कोणाकडे राहणार, याबाबत दावे-प्रतीदावे सुरू झाले आहेत.

सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार १५ हजारांच्या फरकाने पराभूत झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या विविध विकासकामांमुळे मतदारांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखविला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रसकडून करण्यात येत आहे. हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे. कसबा विधानसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला होता. मात्र काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही हा मतदारसंघ काँग्रसेला जाईल, असे सांगत आहेत. त्यामुळे आघाडीच्या चर्चेत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहिल, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप-शिवसेनेचा विचार करता पहिल्यापासून हा मतदारसंघ भाजपकडे राहिला आहे. महापलिका निवडणुकीत या मतदार संघातून मोठय़ा संख्येने पक्षाचे नगरसेवक विजयी झाले. विद्यमान आमदार, महापालिकेतील सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्षही याच मतदारसंघातील आहेत. शिवसेनेला गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. पर्वतीमधून शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे राहील, असा दावा करण्यात येत आहे.

आघाडीतील चर्चेला अद्याप सुरुवात झालेली नाही. कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाईल, यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल. मात्र काँग्रेसचा मध्यवर्ती भागातील मतदारसंघावरील दावा कायम राहील.

– रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस

भाजपला मानणारा मतदार या मतदारसंघात मोठय़ा संख्येने आहे. सन २००९ च्या निवडणुकांपासून हे दिसून आले आहे. शिवसेनेकडून दावा केला होईल, अशी शक्यता नाही. मात्र झाला तरी भाजपची ताकद पाहाता पर्वती मतदारसंघ भाजपकडेच राहील.

हरिश परदेशी, मंडल अध्यक्ष, पर्वती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button