breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निद्रिस्त महावितरणला जागे करण्यासाठी भाजपचे ‘जागा हो कुंभकर्णा’ आंदोलन

  • निगडी प्राधिकरणात विद्युत समस्यांचा नागरिकांना त्रास
  • महावितरण प्रशासनाच्या विरोधात भाजप झाली आक्रमक

पिंपरी / महाईन्यूज

निगडी प्राधिकरणातील महावितरणच्या गैरकारभारामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वीज वापरापेक्षा वाढीव बीले दिली जात आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दुय्यम दर्जाची विद्युत सामग्री वापरात आणल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणाच्या अशा गलथान कारभाराविरोधात भाजपच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे व महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी (दि. २१) महावितरण कार्यालयावर ‘जागा हो कुंभकर्णा’ आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महावितरणच्या अधिका-यांना कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा देऊन निषेध नोंदविण्यात आला. ‘कुंभकर्णाच्या अवस्थेतून बाहेर पडा आणि कारभार सुधारा’ अन्यथा खैर नाही, अशा शब्दांत माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी विद्युत अधिका-यांना इशारा दिला.

यावेळी माजी उपमहापौर तथा भाजपच्या विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण समिती सदस्य समीर दिलीप जावळकर, भाजपा प्राधिकरण-चिंचवड स्टेशन मंडल अध्यक्ष विजय शिनकर, पिं. चिं. प्राधिकरण-चिंचवड मंडल सरचिटणीस सचिन कुलकर्णी, भाजपा कार्यकर्ते सलीम शिकलगार, राधिक बोर्लीकर, मनोज देशमुख, आनंद देशमुख, सचिन बंदी, रमेश घाटे, केतन जाऊळकर, नरेंद्र येलकर, देसाई, प्रसेन अष्टेकर, नीलिमा कोल्हे व परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैलजा मोरे म्हणाल्या, ‘प्राधिकरणातील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील वीज ग्राहक त्रस्त आहेत. समस्यांसाठी ग्राहकांना कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिसरात मनमानी पध्दतीने वीज पुरवठा खंडित केला जात आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी महावितरणचे अधिकारी गवारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म आहे. केवळ दुरुस्ती करतो. आमच्याकडे साधन सामुग्रीचा अभाव आहे. साधने नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली जात आहे. ग्राहकांना भरमसाठ वीजबिले पाठविली जात आहेत. अशा वेळी ग्राहकांनीच जर बिले भरायला आमच्याकडे पैसे नाहीत, असे म्हणून हात वर केले तर, कुठे बिघडते. परिसरात मीटरच्या तक्रारी आहेत. धोकादायक डीपी बॉक्स आहेत. त्यावर काहीही कारवाई होत नाही. दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकानुसार परिसरातील बत्ती गुल असते. डीपी बॉक्समधून धूर निघूनही काम लवकर होत नाही. धमकी देऊनही फरक पडत नाही. मग यांचा कोणीतरी गॉडफादर असेलच, तो तरी नागरिकांना दाखवा. साध्या-सुध्या कामालादेखील आठ दिवस लागत असतील तर, प्रभागातील जनतेने हातात लाटणे घेण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही.

अनुप मोरे म्हणाले, ‘प्राधिकरणातील महावितरणच्या विद्युत विभागाकडे नियोजनाचा अभाव आहे. कोरोनामुळे आर्थिक मंदी आणि बेरोजगाराचे संकट उद्भवले असतानाही महावितरण मात्र निष्ठुरपणे प्रचंड मोठमोठी बिले ग्राहकांना पाठवत आहे. आर्थिक मंदीने तसेच कोरोना महामारीने आधीच जनतेचे कंबरडे मोडले असताना चुकीची अवास्तव बिले व वसुली यांनी जनतेला जेरीस आणले आहे. महावितरणची अशा प्रकारची लूटमार तातडीने थांबली पाहिजे. कोरोनामुळे मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु आहेत. लाईट गेल्यामुळे मुलांना शिक्षण नीट घेता येत नाही. वाढीव बिले आलेल्या ग्राहकांना उद्धट उत्तरे दिली जातात. आकुर्डी प्राधिकरण गंगानगर, पंचतारानगर परिसरात पहाटे पाच वाजता वीज जाते. रात्री बारा वाजता वीज येते. उत्तरं मागितली की ग्राहकांना शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला जातो. विजेच्या उच्च दाबामुळे ग्राहकांचे टीव्ही-फ्रिज नादुरुस्त होतात. त्यामुळे वस्तूंचे आर्थिक नुकसान होत आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महावितरण अधिकाऱ्यांकडे मागितली आहेत. आज शांततेत आंदोलन केले. येत्या काही दिवसात या समस्या तडीस न गेल्यास महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घरी जाणे देखील मुश्कील करू. या झोपलेल्या महावितरणरुपी कुंभकर्णाचा वध केल्याशिवाय राहणार नाही.

समीर जावळकर म्हणाले, महावितरणचे प्राधिकरण परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. कुठलीही कामे होत नाहीत. ग्राहकांच्या हक्काचे फलकसुद्धा त्यांना लावता आलेले नाहीत. समस्या सुटल्या नाहीत तर, लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ग्राहक मंचाचे कार्यकर्ते देसाई यांनी महावितरणला नेमून दिलेल्या गाईडलाईननुसार वेळेत तक्रारी सोडविल्या पाहिजेत. परंतु, त्या सुटत नाहीत. वेळोवेळी कारणे सांगितली जातात. महावितरण अधिकाऱ्याकडून जनतेची कामे होत नसतील तर आम्ही तुमच्या वरिष्ठांकडे जाऊ. भरमसाठ बिले पाठविली जातात. ज्येष्ठ नागरिकांनी हे बिल कसे भरायचे. आम्हाला उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. हाकलून दिले जाते. थोडासा पाऊस झाला कि लाईट जाते. याचे कारण समजत नाही.

यावेळी ‘महावितरण कार्यालयाचा निषेध असो’, ‘समस्या सोडवा अन्यथा घरी जा’, ‘भारत मता की जय’ अशा घोषणा देऊन महावितरण प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button