breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नवरात्रोत्सवातील नृत्य शिकवणाऱ्या कार्यशाळा जोरात

आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंतचे शुल्क; नवनवीन प्रकार शिकण्यासाठी तरुणाईची गर्दी

मुंबई : नवरात्रोत्सवाचे आकर्षण केवळ कपडे आणि दागिन्यांपुरतेच मर्यादित राहिले नसून उत्सवात आकर्षक नृत्य करून बघ्यांची मने जिंकण्यासाठीची स्पर्धाही रंगू लागली आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांमध्ये गरबा आणि दांडियातील नवनवीन नृत्य प्रकार शिकवणाऱ्या वर्ग तसेच कार्यशाळांची जोरदार चलती आहे. आठशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचे शुल्क घेणाऱ्या या कार्यशाळांतून पारंपरिक गरब्यासह पोपट, हुडी, सेल्फी अशा नवनवीन ‘स्टेप्स’चेही धडे तरुणाई गिरवत आहे. याखेरीज यूटय़ूबसारख्या संकेतस्थळांवरून गरब्याचे ऑनलाइन प्रशिक्षण घेण्याकडेही कल वाढत आहे.

नवरात्रोत्सवातील गरबा नृत्य पारंपरिक असले तरी, दरवर्षी त्याला आधुनिकतेची वा नावीन्याची जोड मिळते. दरवर्षी या नृत्यप्रकारात नवनवीन आविष्कार दाखल होत असतात. या उत्सवाबद्दल तरुणाईला भारी आकर्षण असल्याने हे नृत्यप्रकार शिकवणाऱ्या वर्गाना सध्या जोरदार मागणी आहे. नवरात्रीच्या दोन महिने आधीपासून हे वर्ग वा कार्यशाळा चालवण्यात येतात.

मुंबई, ठाण्यातील मोठमोठे क्लब, असोसिएशनतर्फे आपल्या सदस्यांकरिता कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. याखेरीज नामांकित नृत्यदिग्दर्शकांकडूनही गरबा प्रशिक्षणाचे वर्ग भरवण्यात येतात. आठशे रुपयांपासून शुल्क आकारणाऱ्या या शिकवणीवर्गात तरुण-तरुणींसह इतर वयोगटांतील मंडळीही आता सहभागी होत आहेत, अशी माहिती मुंबई, ठाण्यातील मोठमोठे क्लब, असोसिएशनतर्फे आपल्या सदस्यांकरिता कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. याखेरीज नामांकित नृत्यदिग्दर्शकांकडूनही गरबा प्रशिक्षणाचे वर्ग भरवण्यात येतात. आठशे रुपयांपासून शुल्क आकारणाऱ्या या शिकवणीवर्गात तरुण-तरुणींसह इतर वयोगटांतील मंडळीही आता सहभागी होत आहेत, अशी माहिती नृत्यांगना आणि नृत्य कलाकेंद्रच्या प्रमुख मुग्धा नारकर यांनी दिली. एकदिवसीय कार्यशाळांपासून दहा दिवसांपर्यंतच्या वर्गाची सध्या चलती आहे. काही नामांकित नृत्य दिग्दर्शक आठवडाभराच्या वर्गासाठी पाच ते आठ हजार रुपये आकारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कसरतीसाठीही शिकवणी

नवरात्रीपूर्वी गरबा शिकण्याच्या वर्गाना होणारी गर्दी ही केवळ आकर्षक नृत्य करून बक्षिसे जिंकण्यासाठीच नव्हे तर, अनेक मंडळी नवरात्रोत्सवापूर्वी आपले वजन कमी करण्यासाठीही या वर्गाना पसंती देतात. ‘पॉवर गरबा’ नावाच्या प्रकारातून अनेकांनी वजन कमी केल्याचे ठाण्यातील सचिन अकादमीच्या वैशाली

सत्रा यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी प्रशिक्षण वर्ग सुरू करणाऱ्या सत्रा यांनी ‘झिंगाट’ गाण्यावर गरबा शिकवला. यंदा ‘चौगाडा तारा’ या गाण्यावर थिरकण्यासाठी प्रशिक्षण घेतले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

टप्प्याटप्प्याने ‘स्टेप्स’ प्रशिक्षण

गरबा नृत्याचा एक विशेष अभ्यासक्रमच असून त्यात नवशिक्यांना प्रथम गरब्याच्या साध्यासोप्या पद्धती शिकवल्या जातात. एक टाळी, दोन टाळी, तीन टाळी या पारंपरिक प्रकारांसह साल्सा, बॉलीवूड फ्युजन हे प्रकारही यात शिकवले जातात. सध्या ‘पोपट’ ही ‘स्टेप’ लोकप्रिय असून हुडी आणि सेल्फी या स्टेपनाही पसंती मिळत आहे. नृत्य शिकवण्याखेरीज गरब्यासाठीचा पेहराव, घागरा गोल फिरवण्यासाठीच्या नेमक्या हालचालीही यात शिकवल्या जातात. ‘दांडीया किंग किंवा क्विन ठरणाऱ्या विजेत्यांकडून रसिकांना गरबा नृत्य शिकायचे असते. मी स्वत: नृत्य प्रशिक्षण घेतलेले आहे. मात्र गरबा किंग ठरल्यानंतर अनेक जण माझ्याकडे गरबा शिकायला येऊ  लागले. गरबामुळे आज माझं करिअर घडलं’, असे विशाल सावडीया म्हणाले.

ऑनलाइन प्रशिक्षण, यूटय़ूबलाही पसंती

रोजच्या दिनक्रमातून स्वतंत्र शिकवणीवर्ग लावणे शक्य नसलेली मंडळी यूटय़ूब किंवा ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाची मदत घेत आहेत. राधिका राठोड या तरुणीने यूटय़ूबवर गरबा प्रशिक्षणासंबंधी वाहिनी सुरू केली आहे. या वाहिनीला जवळपास १३ लाख पाठीराखे लाभले आहेत. यंदा ‘फ्युजन’ नृत्यप्रकारावर तरुणाईचा भर असल्याचे ती सांगते. याखेरीज यूटय़ूबवरील इतर व्हिडीओंतूनही गरबा शिकण्याचे धडे घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button