breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नवनवीन प्रयोग करुन उत्पादन वाढविणा-या शेतक-यांची ‘रिसोर्स बॅंक’

मुंबई |महाईन्यूज|

शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी. त्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणारे अभियान तालुका स्तरावर घ्यावेत, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विभागाला दिले आहेत. महिनाभरात ही बॅंक तयार करावी, अशा सूचनाही कृषीमंत्र्यांनी दिल्या आहेत.

विभागाची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी नुकतेच पुणे येथे कृषी आयुक्तालयाच्या सर्व विभागांची बैठक घेतली. कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंचीही त्यांनी बैठक घेतली. शनिवारी त्यांनी मंत्रालयात सुमारे तीन तास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक, सहसंचालक, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेतली. क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या विविध अडचणींची माहिती कृषिमंत्र्यांनी करून घेतली.

अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच झाला. योजनांची अंमलबजावणी करताना ज्या समस्या येतात त्यावर मार्ग काढला जातो मात्र त्यामुळे बऱ्याचदा यंत्रणेला रोषाला सामोरे जावे लागते, हे टाळण्यासाठी काय करू शकतो आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायमच शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचे सांगत शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना राबवाव्यात, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. राज्यात अनेक शेतकरी परिस्थितीशी मुकाबला करत शेतीत आमूलाग्र बदल करणारे नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगाला यशदेखील येत आहे. त्यामुळे कृषी उत्पादनात अपेक्षित वाढदेखील होताना दिसतेय.

अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशकथा बांधावर राबणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास त्यांनाही फायदा होऊ शकतो. त्यासाठी फळपिके, भाजीपाला यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करावी, अशी सूचना कृषिमंत्र्यांनी केली. या शेतकऱ्यांच्या बॅंकेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन तेही प्रात्यक्षिकांसह देण्याचा मानस असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रयोगशील शेतकऱ्यांची यादी करून त्यांचा वापर प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button