breaking-newsराष्ट्रिय

‘नथुराम देशभक्तच’

प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान; पक्षाच्या कानउघाडणीनंतर माफी

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, तो देशभक्त आहे आणि तो देशभक्तच राहील, असे वादग्रस्त विधान मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरुवारी केले. गोडसे याला दहशतवादी म्हणणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिला.

भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या या वादग्रस्त विधानामुळे भाजप पुन्हा अडचणीत आली आहे. संबंधित विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. प्रज्ञासिंह यांच्या विधानाशी भाजप सहमत नाही. त्यांच्या विधानाचा भाजप निषेध करत आहे. यासंदर्भात पक्ष त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागेल, असे भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले. भाजपकडून झालेल्या कानउघाडणीनंतर प्रज्ञासिंह यांनी विधान मागे घेत माफी मागितली असल्याचे मध्य प्रदेशचे प्रभारी विनय सहस्रबुद्धे म्हणाले.

सक्रिय राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी असल्याचे मत जाहीर सभेत व्यक्त केले होते. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता प्रज्ञासिंह यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे प्रत्युत्तर दिले. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख   शहीद हेमंत करकरे यांना आपल्या शापामुळेच प्राण गमवावे लागल्याचे विधान करून प्रज्ञासिंह यांनी यापूर्वीही पक्षाला अडचणीत आणले आहे. भोपाळ मतदारसंघातील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रज्ञासिंह यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.

काँग्रेसकडून निषेध

प्रज्ञासिंह यांच्या विधानाचा काँग्रेसने कठोर शब्दांत निषेध केला आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर भाजपचे नेते सातत्याने हल्ले करत आहेत. प्रज्ञासिंह यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा भाजपचा हिंसक चेहरा उघडा पडला असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. शहीद हेमंत करकरे यांचा अनादर करणाऱ्या प्रज्ञासिंह यांचा पंतप्रधान मोदींनी बचाव केला होता. मेरठमध्ये महात्मा गांधींचा पुतळा तयार करून त्यावर गोळ्या मारल्या गेल्या आणि गांधी हत्येचे समर्थन केले गेले. या घटनेविरोधात केंद्रातील भाजप सरकारने मूकसंमती दर्शवली. भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम देशभक्त असल्याचे म्हटले होते, अशा घटनांची आठवण सुरजेवाला यांनी करून दिली. नथुराम गोडसे संपादक असलेल्या अग्रणी या मासिकात १९४५ मध्ये गांधींवर बाण रोखलेले व्यंगचित्र छापले गेले होते. त्याद्वारे पं. नेहरू, सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबेडकर, मौलाना आझाद, सी. राजगोपालाचारी आदी काँग्रेस नेतृत्वाला देशविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मोदींकडे विवेकबुद्धी असेल तर त्यांनी प्रज्ञासिंह यांना कठोर शिक्षा करावी आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button