धैर्यशील माने पोहोचले राजू शेट्टींच्या भेटीला, शेट्टींच्या आईंचे घेतले आशीर्वाद
हातकणंगले मतदारसंघातून धक्कादायक निकाल देत विजयी झालेले शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाच पराभव करत विजय मिळवला आहे. पण निकाल लागल्यानंतर सर्व मतभेद विसरत धैर्यशील माने राजू शेट्टींच्या भेटीसाठी त्यांच्या घऱी पोहोचले. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्या आईचे आशिर्वाददेखील घेतले.
लोकसभा निवडणुकीदरम्यान नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचाराची मैदानं गाजवली होती. पण निकाल लागल्यानंतर नेतेमंडळी आपापसातील मतभेत विसरुन एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. असंच काहीसं चित्र हातकणंगलेत पहायला मिळालं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी राजू शेट्टींचा पराभव केला ते धैर्यशील माने आज त्यांच्या घरी भेटीला पोहोचले.
‘धैर्यशील माने माझ्या नातवासारखे आहेत. जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा’, असा आशीर्वाद यावेळी राजू शेट्टींच्या आईंनी धैर्यशील माने यांना दिला. राजू शेट्टी यांनी धैर्यशील माने माझ्या घरी आल्यामुळे खूप आनंद झाला. त्यांनी लोकसभेत चांगले प्रश्न मांडावेत अशी प्रतीक्रिया यावेळी दिली.