breaking-newsआंतरराष्टीय

धर्मांतर करा किंवा भारतात परत जा…

काबुल – पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्‌यात 19 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्‌यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीतील एकमेव शीख उमेदवार असलेल्या अवतार सिंह यांचाही मृत्यू झाला.

अवतार सिंह यांच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तानातील सर्वच शीख बांधवांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून त्यांच्यामध्ये सध्या अफगाणिस्तानात राहणे अशक्‍य असल्याची भावना दृढ होत आहे. तसेच धर्मांतर करा अथवा भारतात जा असे दोनच पर्याय राहिले असल्याची भावनाही त्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे रोजच जीव मुठीत धरून जगणारे हे लोक भारताच्या आश्रयाला येण्याच्या विचारात आहेत.

भारताच्या मदतीतून बांधलेल्या एका इस्पितळाच्या उदघाटनासाठी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी रविवारी जलालाबादमध्ये गेले होते. त्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या बव्हंशी अल्पसंख्य समाजातील लोकांची बस “इसिस’च्या अतिरेक्‍यांनी उडवून दिली. त्यात येत्या ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीतील एक उमेदवार अवतार सिंग खालसा व आणखी एक सामाजिक नेते रावैल सिंग यांच्यासह शिख समुदायातील 13 व्यक्ती ठार झाल्या होत्या.

या भीषण हत्याकांडानंतर “आता आम्हाला येथे राहणे शक्‍य नाही’, असे सांगून अवतार सिंग यांचे पुतणे व हिंदू व शिखांच्या राष्ट्रीय समितीचे सचिव तेजवीर सिंग यांनी भयभीत शिख समुदायाच्या मनातील कमालीची असुरक्षित भावना व्यक्त केली. जलालाबाद घटनेनंतर काही शिखांनी काबुलमधील भारतीय वकिलातीमध्ये आश्रय घेतला आहे. मृतांना भारतात नेऊन तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी भारताने दर्शविली. पण 13 पैकी आठ मृतांवर जलालाबादमध्येच कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले.

यावेळी, तेजवीर सिंग म्हणाले, आम्ही अफगाण नागरिक आहोत व सरकारही आम्हाला पूर्ण नागरिकच मानते. परंतु आम्ही मुस्लिम नाही म्हणून इस्लामी अतिरेकी आम्हाला येथे आमच्या धर्माचे पालन करू देणार नाहीत हे उघड आहे. जलालाबादमध्ये कापड व पुस्तकांचे दुकान चालविणारे बलदेव सिंग म्हणाले की, आता आमच्यापुढे दोनच पर्याय शिल्लक आहेत. एक तर येथेच राहण्यासाठी धर्मांतर करून मुस्लिम व्हायचे किंवा भारतात जायचे. मात्र, ज्यांचे भारतात आता नातेसंबंध नाहीत व येथेच उद्योग-व्यवसाय आहेत, अशा काही मोजक्‍या शिखांचा काहीही झाले तरी अफगाणिस्तानातच राहण्याचा निर्धार केला आहे.
भारताचे दरवाजे खुले

छळाला कंटाळलेल्या तसेच जीव धोक्‍यात असलेल्या शेजारी देशांतील हिंदू, शिख व बौद्ध नागरिक येथे आल्यास, भारत त्यांना दीर्घकालीन वास्तव्याचा व्हिसा देतो. त्यांना भारतीय नागरिकत्व सुलभ करण्याचा कायदाही अलीकडेच करण्यात आला आहे. जलालाबाद घटनेनंतर भारताचे काबूलमधील राजदूत विनय कुमार म्हणाले, येथील शीख भारतात येऊन हवा तेवढा काळ राहू शकतात. अर्थात, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. भारत सरकार त्यांना हरतरऱ्हेची मदत करायला तयार आहे त्यांच्या साठी देशाचे दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button