breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड

धक्कादायक; दारूगोळा पुणे स्टेशनवर ठेवून सहा कर्मचारी घरी निघून गेले

पिंपरी|महाईन्यूज|

ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार झालेला आणि अन्य राज्यांत पाठवायचा सरकारी दारूगोळा पुणे स्टेशनवर ठेवून सहा कर्मचारी घरी निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या प्रमाणातील हा साठा असाच ठेवून देण्यात आल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाच्या तपास यंत्रणेने हा प्रकार रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यावर एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी २४ तास सशस्त्र बंदोबस्त ठेवून ठरलेल्या दिवशी हा साठा अन्य राज्यांत पाठवून दिला.

पुणे जिल्ह्यातील अॅम्युनिशन फॅक्टरीत सैन्यदलांसाठी वापरण्यात येणारा दारूगोळा तयार होतो. तोफांसाठी वापरण्यात येणाऱ्या दारूगोळ्याचे बॉक्स अन्य राज्यांत पाठविण्यात येणार होते. त्यासाठी शुक्रवारी (१० जानेवारी) सकाळी पुणे स्टेशनवर हे बॉक्स नेण्यात आले. याच्या सुरक्षेसाठी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या सहा कर्मचाऱ्यांनी हा साठा पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागात नेला. याची रीतसर नोंदही करण्यात आली. परंतु, ज्या राज्यात हा साठा पाठवायचा होता त्या ठिकाणी जाणारी रेल्वे दोन दिवसानंतर होती. त्यामुळे पार्सल विभागात हा साठा ठेवण्यात आला. परंतु, त्यानंतर संबंधित कर्मचारी निघून गेले. याची माहिती सायंकाळी उशिरा संबंधित विभागाच्या तपास यंत्रणेला मिळाली. त्यानंतर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ही माहिती रेल्वे पोलिसांना कळविली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वान पथकासह पार्सल विभागात धाव घेतली. तपासणीनंतर हा साठा सरकारी असल्याचे समजल्यावर रेल्वे पोलिसांनी स्वतःकडील शस्त्रधारी कर्मचारी त्या ठिकाणी तैनात केले. त्या सहा कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यातील चौघांचा संपर्कच झाला नाही. तर अन्य दोघांनी काही वेळातच स्टेशनमध्ये पोहचतो, असे सांगितल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button