breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो ट्रेनचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा कंदील दाखवला. दिल्ली मेट्रोच्या मॅजन्टा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.

या प्रकल्पाबाबत बोलताना मोदी म्हणाले, “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशातील पहिला मेट्रो रेल्वे प्रकल्प दिल्लीत उभारण्यात आला. सन २०१४ मध्ये देशातील केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत होती. आज १८ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे धावत आहेत. सन २०२५ पर्यंत देशातील २५ शहरांमध्ये आम्ही मेट्रो प्रकल्प वाढवणार आहोत.”

देशात सन २०१४ मध्ये केवळ २४८ किमी इतक्या अंतरावर मेट्रो लाईन सुरु होत्या. आज तीनपट जास्त म्हणजेच ७०० किमी अंतरावर मेट्रो धावत आहेत. सन २०२५ पर्यंत आम्ही त्या १७०० किमी पर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही मोदी यावेळी म्हणाले. मेट्रोचा विस्तार करताना ‘मेक इन इंडिया’ मोहिम महत्वाची भूमिका बजावत असून यामुळे प्रकल्पांचा खर्च कमी झाला असून परकिय चलनाचीही बचत झाली आहे. तसेच देशातील नागरिकांना अधिक रोजगारही उपलब्ध झाल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते कॉमन मोबिलिटी कार्डचेही उद्घाटन करण्यात आले. देशाच्या आधुनिकीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून तुम्ही कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करा, यासाठी हे एकच कार्ड तुम्हाला उपयोगी पडेल, असं मोदी यावेळी म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आधुनिक मेट्रो सेवा उपलब्ध झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button