breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीच्या सीमांवर भिंत उभारल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल

नवी दिल्ली – कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असे चित्र सध्या दिल्लीच्या वेशीवर निर्माण झाले आहे. नवीन कृषी कायदे रद्द करा, असे म्हणत दोन महिन्यांपूर्वी पंजाब, हरयाणासह देशातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक दिली होती. मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आले. तेव्हापासून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता तर हे आंदोलन अधिक आक्रमक झाले असून शेतकरी दिल्लीत शिरु नयेत यासाठी दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही ठिकाणी चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती उभारल्या आहेत. काँक्रीटचे बांधकाम असलेल्या या भिंती राष्ट्रीय महामार्गांवर उभारुन दिल्ली पोलिसांनी शेतकरी आंदोलकांसाठी नाकाबंदी केली आहे. इतकेच नाही तर, या भितींच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा असे वेगवेगळे अडथळे उभारून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिल्ली सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंतही पोहोचता येत नाहीये. परिणामी ऐन कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे कितीही त्रास सहन करावा लागत असला तरी आपण मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘पाण्याचा पुरवठा बंद केल्याने आम्ही मागे हटू असा विचार सरकारने करु नये. आम्ही शेतकरी आहोत, गरज पडली तर पाण्यासाठी बोरवेल खोदू मात्र आमच्या मुलांच्या भविष्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही गावी परत जाणार नाही’, असा इशाराच शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, चंदिगढच्या बाजूनेही काही शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांना शौचालय वापरण्यास बराच वेळ वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता उघड्यावर शौचाला जात असून महिला आंदोलकांना शौचालये वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button