breaking-newsआंतरराष्टीय

दहशतवाद्यांवर ठोस कारवाई करणार!

पाकिस्तानचे अमेरिकेला आश्वासन

आपल्या देशातून कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पाकिस्तानने दिल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिली. भारतासोबतचा तणाव निवळण्यासाठीही उपाययोजना करण्याची ग्वाही पाकिस्तानने दिल्याचे बोल्टन यांनी सांगितले.

भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांच्याशी सोमवारी चर्चा करून पुलवामा हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची गरज व्यक्त केली होती. त्याच वेळी बोल्टन यांनी आपण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महम्मूद कुरेशी यांच्याशी चर्चा केल्याचे स्पष्ट केले. जैश-ए-मोहम्मदसह पाकिस्तानमधून कारवाया करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढू न देण्याचे आश्वासन कुरेशी यांनी दिल्याचे बोल्टन यांनी सांगितले.

‘‘पाकिस्तानला शांतता व स्थिरता हवी आहे. त्यामुळेच तणाव निवळण्याच्या दृष्टीने सदिच्छेखातर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाची सुटका केली. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना परत भारतात पाठवण्यात आले आहे.’’, असे कुरेशी यांनी सांगितल्याचे बोल्टन म्हणाले.

परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकी परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांच्यातील चर्चेत पुलवामा हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका ही भारतीय नागरिक आणि सरकार यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन पॉम्पिओ यांनी यावेळी गोखले यांना दिले.

पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडीत भारताला ठोस पाठिंबा दिल्याबाबत गोखले यांनी पॉम्पिओ यांचे आभार मानले असून पाकिस्तानने दहशतवादी संघटनांच्या छावण्या नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि दहशतवादी कारवायांस जबाबदार असलेल्यांना शिक्षा केली पाहिजे, यावर अमेरिका व भारत यांच्यात मतैक्य झाल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

जैश’च्या अड्डय़ावर २६३ दहशतवादी

भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अड्डय़ावर हल्ला करण्यापूर्वी पाच दिवस अगोदर तेथे २६३ दहशतवादी जमले असल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे. जैशमध्ये भरती होण्यासाठी आलेले हे सर्व दहशतवादी आणि त्यांच्या प्रशिक्षकांकडे असलेले भ्रमणध्वनी कार्यान्वित होते. भारताच्या नॅशनल टेक्निकल रीसर्च संस्थेकडून (एनटीआरओ) या भ्रमणध्वनींच्या सिग्नलवर लक्ष ठेवण्यात आले होते.

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर हे सर्व सिग्नल बंद झाले, असे वृत्त गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने सदर वाहिनीने दिले आहे. मृतांच्या आकडय़ाबद्दल भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, मात्र भ्रमणध्वनी सिग्नलच्या आधारे २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा प्रसारमाध्यमांकडून करण्यात येत आहे.

हल्ल्याच्या वेळी बालाकोटमधील जैशच्या अड्डय़ावर १८ कमांडर होते आणि ते दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार होते, जैशच्या कमांडरकडे अफगाणिस्तानात अमेरिकेविरुद्ध लढण्याचा अनुभव होता. भारताने केलेल्या हल्ल्यात हे सर्व जण ठार झाले असल्यास तो जैशसाठी मोठा दणका आहे. मुफ्थी उमर, मौलाना जावेद, मौलाना अस्लम, मौलाना अजमल, मौलाना झुबेर, मौलाना अब्दुल गफूर काश्मिरी, मौलाना कासीम आणि मौलाना जुनैद हे दहशतवादी तेथे होते. हे सर्व जण जैशचा म्होरक्या मसूद अझरचे निकटवर्तीय होते.

या अड्डय़ावर ८३ दहशतवादी दौरा-ए-आम म्हणजे दहशतवादाच्या प्राथमिक प्रशिक्षणासाठी आले होते, ९१ दहशतवादी दौरा-ए-खास आणि २५ दहशतवाद्यांना फिदायी आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात येणार होते. या सर्वाच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आचारी आणि सुरक्षारक्षकही अड्डय़ावर होते, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button