TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्यांच्या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच’, शिवसेनेचं प्रत्युत्तर

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. काँग्रेसकडून नामांतराला विरोध केला जात असतानाच भाजपाने मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. “औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी त्याचा संबंध जोडणे मूर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसेलही, पण राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करून टाकले व जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत काही बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत. निदान या विषयावरून सरकारात ठिणगी तरी पडेल, असे काही लोकांना वाटत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला.

“अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रस्ता असे नामांतर होऊ शकते, तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही? असा बिनतोड सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

त्यांच्या या तल्लख बुद्धीचातुर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भारतीय जनता पक्षाचा जो ज्ञानरथ अलीकडच्या काळात उधळला आहे त्या रथाचे पुढचे चाक म्हणजे चंद्रकांत पाटील असाच समज यामुळे मराठी जनतेचा होईल, पण पाटलांच्या या बिनतोड सवालास पूरक म्हणून आम्ही त्यांना एक मुंहतोड जवाब विचारू इच्छितो की, अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या केले, दिल्लीच्या औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम केले त्याच वेळी महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत?

ते जरा जनतेला सांगून टाका! महाराष्ट्रात फडणविसांचे व दिल्लीत मोदींचे सरकार होते व इतर नामांतरांबरोबर छत्रपती संभाजी राजांनाही औरंगजेबाच्या छाताडावर बसवता आले असते. मग सहज शक्य असताना तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवलेत? व आता मात्र शिवसेनेस उलटा प्रश्न विचारीत आहात,” असा उलट सवाल शिवसेनेनं भाजपाला केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button