breaking-newsआंतरराष्टीय

तब्बल 27 वर्षांनंतर ग्रीस आणि मॅकडोनियामधील मिटला वाद

अथेन्स : ग्रीस आणि मॅकडोनिया या देशांमधील शांततेची बोलणी अखेर तडीस गेली आहेत. सुमारे 27 वर्षांनंतर शांतता प्रस्थापित होण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे. मॅकडोनिया हा देश ग्रीसच्या उत्तरेस आहे.

फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हे नाव बदलण्यावर मॅकडोनिया आणि ग्रीस तयार झाले आहेत. या दोन्ही देशांना राजी करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने अनेकवेळेस मध्यस्थी करुन चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हा देश त्याच्या लांबलचक नावातील प्रत्येक शब्दाच्या आद्याक्षरावरुन एफवायआरओएम किंवा मॅकडोनिया नावाने ओळखला जायचा. आता हा देश रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया नावाने ओळखला जाईल.

मॅकडोनिया हे नाव ग्रीसच्या उत्तर प्रांताचे नाव होते. हेच नाव 1991 साली तयार झालेल्या नव्या देशाने घेतल्याने ग्रीक लोक संतप्त झाले होते. हे नाव घेतल्यामुळे आपल्या प्रांतावर उद्या हक्क सांगितला जाईल असे त्यांना वाट होते. इतकेच नव्हे मॅकडोनियातील राजधानीमधील विमानतळाला ग्रीकमधील प्राचीन योद्धा अलेक्झांडर द ग्रेटचे नाव दिल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळली.  मॅकडोनियाला युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये प्रवेश देण्यास ग्रीसने विरोध केला होता.

ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस याबाबत बोलताना म्हणाले, अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी आमचे मतभेद बाजूला ठेवत आहोत आणि आमच्या शेजारी देशाचे नाव बदलण्यावर एकमत झाले आहे. नावामधील हा बदल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडे करण्यात येणार आहेत. ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस आणि मॅकडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव बल्गेरियामध्ये युरोपियन युनियनच्या शिखर परिषदेच्या वेळेस भेटले तेव्हा या नव्या बदलाचे संकेत त्यांनी दिले होते. तसेच सोमवारी आणि मंगळवारी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवच चर्चा झाली.

ग्रीसच्या पंतप्रधानांनी नाव बदलाच्या कराराची माहिती दिल्यावर झाएव यांनी टीव्हीवरुन मॅकडोनियातील नागरिकांना या कराराची माहिती दिली. त्सायप्रस यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी दोन्ही पंतप्रधानांचे कोतुक केले आहे. शनिवारी प्रेस्पा तलावाच्या काठावर या करारावर स्वाक्षरी होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button