breaking-newsपुणेमहाराष्ट्र

डिजिलॉकरमुळे “झिरो पेंडेंसी’

  • नागरिकांसाठी कागदपत्रे तत्काळ उपलब्ध होणार : आरटीओचे काम पेपरलेस

पुणे – केंद्र शासनाने सुरू केलेल्या डिजिटल लॉकर ऍपमुळे वाहनांसंबंधीची सर्व कागदपत्रे यामध्ये साठवता येणार आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 2006 नंतरचा वाहन परवाना, आर.सी. बुक या ऍपमध्ये जतन करण्यात आले असून नागरिकांसाठी ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच आरटीओ कार्यालयाकडून आता नव्याने तयार होणारे लायसन्स, आरसी बुक नोंदणी झाल्याक्षणी ऍपवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे या पुढील काळात लायसन्स, आर.सी. बुक बाबतीत आरटीओत झिरो पेंडंसी होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या देखील आरटीओतील फेऱ्या वाचणार आहेत.

मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन चालवताना वाहनाचा परवाना आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र मूळ स्वरुपात सोबत बाळगणे बंधनकारक आहे. या कागदपत्रांचा (स्मार्ट कार्ड) बटवडा प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत स्पीड पोस्टाने केला जातो. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने या कामाचा मोठा ताण वाढतो. तसेच काही प्रकरणात चुकीचा अथवा अपूर्ण पत्ता असल्या कारणाने पोस्ट विभागास कागदपत्रे नागरिकांच्या पत्त्यावर पोहोचविता येत नाहीत. यामुळे अनेकदा नागरिकांना आरटीओत खेट्ये मारावे लागतात. त्याचबरोबर एखाद्या नागरिकाचा वाहन परवाना हरवला, चोरी गेला तर त्यास डुप्लिकेटसाठी नव्याने अर्ज करावा लागतो. त्यासाठी ठरलेले शुल्क भरावे लागते. त्याचबरोबर यासाठी पुन्हा आरटीओ कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. यात नागरिकांचा वेळ, पैसा वाया जात होता. मात्र, आरटीओने डिजी लॉकरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे लायसन्स तत्काळ या ऍपवर उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचबरोबर एखाद्याने नवी गाडी घेतली असल्यास त्याला सुरवातीला गाडीला नंबर मिळायचा. यानंतर जवळपास तीन ते चार महिन्यांनी आरसी बूक पोस्टाव्दारे घरी यायचे. अनेकदा पोस्ट विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ते अनेक लोकांपर्यंत पोहोचत नसायचे. याचा नागरिकांना मनस्ताप होत असे. मात्र, आता गाडी घेतल्यानंतर काही दिवसांत मोबाईलवर गाडीचा रजिस्ट्रेशन मिळतो. याचवेळी त्याला आरटीओकडून येणाऱ्या संदेशामध्ये तुम्ही तुमचे आर.सी. आता डिजीलॉकरवरून डाऊनलोड करून शकता असा संदेश येतो. यामुळे गाडी मालकाला तत्काळ आर.सी. बुक उपलब्ध होते. यामुळे आर.सी. बुक आणि लायसन्स बाबतीत आरटीओत झिरो पेडेंसी झाली आहे. त्याचबरोबर आरटीओचे कामही पेपरलेस झाले आहे.

डिजिलॉकरवर कागदपत्रांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 2006 पासून पुढचा डेटा या ऍपवर टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर नव्याने तयार होणाऱ्या लायसन्सचा डेटा देखील तत्काळ डिजीलॉकरवर टाकण्यात येत आहे. यामुळे याबाबतीत झिरो पेंडसी होणार असून आरटीओचे कामही पेपरलेस होत आहे. नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी डिजीलॉकर ऍपवर खाते असणे बंधनकारक आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या मोबाईल नंबरवरून हे खाते उघडता येणार आहे. मात्र, यासाठी आधार कार्ड अनिवार्य असून त्याला मोबाईल लिंक असणे आवश्‍यक आहे.
– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button