breaking-newsमनोरंजन

ट्रोल झाल्यानंतर पिळगांवकर म्हणाले, ‘…म्हणून माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा!’

‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यामुळे बऱ्याच दिवसांनी चर्चेत आलेले मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अखेर या व्हिडीओसंदर्भात आपले म्हणणे मांडले आहे. फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून त्यांनी हा व्हिडीओ खूप वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आला होता असे सांगतानाच पुन्हा मी अशा परिस्थितीमध्ये सापडणार नाही यासाठी देवाकडे प्रार्थना करतो असेही म्हटले आहे.

युट्यूबवर शेमारू कंपनीच्या मालकीच्या ‘शेमारू बॉलीगोली’ या अकाउंटवरून १६ ऑगस्ट रोजी ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ नावाचा पाच मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. मुंबईतील जीवनशैलीवर आधारित असलेले हे गाणे सचिन पिळगांवकर यांनीच गायले आहे. मात्र गाण्याची शब्दरचना, संगीत आणि विनोदी प्रकारे चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे ते ट्रोल झाले. अनेकांनी सचिन पिळगांवकर यांनी या व्हिडीओमध्ये काम केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. या व्हिडीओखालील कमेन्टसही एकदम मजेदार होत्या. अनेकांनी पिळगांवकर यांच्यावर निशाणा साधला होता. या सर्व प्रकारानंतर आज सकाळच्या सुमारास सचिन पिळगांवकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून या व्हिडीओ संदर्भातील स्पष्टीकरण दिले.

या पोस्टमध्ये पिळगांवकर म्हणतात, नुकताच सोशल मिडीयावर रिलीज झालेला माझा एक व्हिडीओ बराच चर्चेचा विषय झाला आहे. काहींना हसू आलं काहींना मात्र रडू आलं. ज्यांना माझ्या विषायीच्या प्रेमापोटी असं रडू आलं, त्यांना मी नक्कीच उत्तर देणं लागतो. एवढंच सांगेन की तुम्हाला जसं (हा व्हिडीओ पाहून) वाईट वाटलं, तसं मलाही वाटल्याचं या पोस्टमध्ये सांगितलं आहे. मात्र हा व्हिडीओ आपण कोणत्याही लालसेपोटी केला नसल्याचे सांगताना, विश्वास ठेवा मी हा व्हिडिओ एकाही रुपयाच्या लालसेमुळे किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रलोभनामुळे केला नव्हता. आम्ही कलाकार मंडळी बऱ्याचदा फार त्रास न घेता, जाता जाता कुणा मित्राची मदत होत असेल तर (असे प्रयोग) करत असतो. कधी कुणाच्या दुकानाचं उद्घाटन कर, तर कधी एखाद्या ध्वनिफितिचं अनावरण करण्यासारखी मदत करतो असेही त्यांनी नमूद केले.

पुढे या व्हिडीओबद्दलची माहिती देताना त्यांनी हा अनेक वर्षांपूर्वीचा व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओच्या निर्मितीबद्दलची कहाणी सांगताना ते पोस्टमध्ये लिहितात की, काही वर्षांपूर्वी एका अशाच मझ्या कस्टम डिझायनर मित्राला मदत करण्याच्या उद्देश्याने मी हे गाणं माझ्यावर शूट केलं. सेटवर गेल्यावर काही क्षणातच मला होत असेलली गडबड कळाली. परंतु, स्वत: दिग्दर्शक असल्यामुळे दुसऱ्याच्या कामात दखल देणे हे आजवर कधीच जमले नाही. स्वत: निर्माताही असल्यामुळे आयत्या वेळी सेट सोडून गेल्यास होणाऱ्या नुकसानाबद्दलही माहिती होती, म्हणून तेही करवलं नाही. काही प्रसंगं मी करणार नाही असंही सांगीतलं, जे दुऱ्यांवर (चित्रित) करण्यात आल्याचं पिळगांवकर यांनी पोस्टमध्ये सांगितलं.

मात्र पुढे अनेक वर्ष हा व्हिडीओ प्रकाशित झाला नाही असे सांगताना पिळगांवकर म्हणतात, पुढे जेव्हा जेव्हा तो मित्र भेटला आणि व्हिडिओ रिलिज होऊ शकत नसल्याबद्दल नाराज दिसला, तेव्हा मनाच्या कोपऱ्यात होत असलेल्या आनंदामुळे खूप अपराधीपणाची भावनाही वाटली पण, ती आता हा व्हिडीओ प्रकाशित झाल्यानंतर संपलीय.

हा व्हिडीओ पाहून वाईट वाटल्याचे सांगतानाच, आज मी कायदेशीररित्या किंवा कायद्याच्या मदतीने हा व्हिडिओ नक्कीच काढून टाकायला लावू शकतो. परंतु, मी तसं करणार नाही. कारण, माझ्या मित्राचा किंवा आताच्या निर्मात्यांचा, कुणाचाही ‘हेतू’ काही वाईट करण्याचा नव्हता, याची मला खात्री आहे. मग, केवळ आपली आवड त्यांच्यावर लादण्याइतकी लोकशाहीची गळचेपी मी कशी करु? असा सवाल पिळगांवकर यांनी त्यांच्या चाहत्यांना केला आहे.

पोस्ट संपवताना ते म्हणतात, ‘शेवटी एवढंच सांगेन की, चूक असती तर माफी मागून ‘पुन्हा करणार नाही’ म्हटलं असतं. पण, एखाद्या दुसऱ्या अशा कटू अनुभवामुळे मित्रांसाठी चांगुलपणा दाखवायची ‘चूक’ करणे मी नक्कीच थांबवणार नाही. मग, तुम्ही आणि मी काय करु शकतो? एवढंच की अशा परिस्थितीत मी पुन्हा पडू नये म्हणून देवाजवळ प्रार्थना!, असं म्हणतानाच शेवटी अशी प्रार्थना तुम्ही प्रेक्षक आणि माझे हीतचिंतक म्हणून नक्की कराल याची मला खात्री आहे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ काढून टाकला

एकिकडे पिळगांवकर यांनी आपण हा व्हिडीओ काढायला सांगणार नसल्याचे म्हटले असले तरी दुसरीकडे ‘शेमारू बॉलीगोली’ या युट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला आहे. ‘आमची मुंबई’ अल्बममधील गाण्याची शब्दरचना मोहम्मद अकील अन्सारी यांनी केली आहे. तर व्हायरल झालेल्या व्हिडीओचे दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन डीसी द्रविडने केले आहे. मन्नत फिल्मसने या व्हिडीओची निर्मिती केली आहे. या व्हिडीओखालील डिस्क्रीप्शननुसार ‘मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात. हे शहर अफलातून आणि भन्नाट आहे. मुंबई शहराची हिच वैशिष्ठ्ये या गाण्यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असं म्हणत या गाण्याचा आस्वाद घ्या असेही त्यात नमूद करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button