breaking-newsताज्या घडामोडीपुणे

टेमघर धरण दोन वेळा भरेल एवढा पाऊस

  • आजवर पाच हजार मि.मी. पावसाची नोंद

टेमघर धरण परिसरात यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या धरणात १ जूनपासून तब्बल पाच हजार चार मिलिमीटर पाऊस झाला असून ही आकडेवारी पाहता एवढय़ा पावसात टेमघर धरण दोन वेळा भरले असते. दरम्यान,अद्यापही टेमघर धरण परिसरात तुरळक पाऊस पडत आहे.

टेमघर धरण मुठा नदीवर मुळशी तालुक्यातील मौजे लव्हार्डे येथे बांधले आहे. या धरणाचे बांधकाम २००० साली सुरू करून २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. हे धरण पुणे शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी आणि मुळशी तालुक्यातील एक हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित आहे.

टेमघर धरणाच्या परिसरात दरवर्षी साधारण दोन हजार ते दोन हजार चारशे मि.मी. एवढा पाऊस होत असतो. मात्र, यंदा तब्बल पाच हजार चार मि.मी. पाऊस आतापर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडला आहे. म्हणजेच आतापर्यंत पावसाचे तब्बल साडेसात टीएमसी एवढे पाणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या रूपाने पडले आहे. एवढय़ा पाण्यात हे धरण दोन वेळा भरले असते. तर, हे धरण भरल्यानंतर आतापर्यंत सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

दरम्यान, टेमघर धरणाची गेल्या दोन वर्षांपासून दुरूस्ती सुरू असल्याने हे धरण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच रिकामे करण्यात आले होते. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात हे धरण १०० टक्के भरले. पहिल्यांदा १०० टक्के धरण भरले, तेव्हा या धरणाच्या परिसरात तब्बल तीन हजार मि.मी. पाऊसाची नोंद करण्यात आली होती. पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या धरणातून पुन्हा खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा हे धरण १०० टक्के भरले. सध्या या धरणात ३.३५ टीएमसी म्हणजेच ९०.२२ टक्के एवढा पाणीसाठा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button