breaking-newsक्रिडा

टेबल टेनिस स्पर्धा: ईशा जोशी व वैभव दहीभाते यांना विजेतेपदाचा मान

प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: ईशा जोशी आणि वैभव दहीभाते यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या प्लेअर्स चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी आणि महिला एकेरीचे विजेतेपद आपल्या नावे केले. तर प्रौढांच्या एकेरीत पाचवे मानांकन असलेल्या अजय कोठावलेने नितीन मेहेंदळेचा पराभव करताना विजेतेपद पटकावले.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात दुसरे मानांकन असलेल्या वैभव दहीभातेने अग्रमानांकित सनत बोकीलचा 12-10, 7-11, 6-11, 11-8, 11-8, 14-12 असा संघर्षपूर्ण पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याबद्दल असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणारा सामना म्हणून या लढतीकडे पाहता येईल, इतका उत्कंठावर्धक आणि चढउतार पाहाणारा हा सामना होता. सामन्याचा पहिला सेट वैभवने कसून प्रयत्नांनंतर 12-10 असा आपल्या नावे केला.

मात्र, सनतने पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे 7-11 आणि 6-11 असा एकतर्फी जिंकत आघाडी घेतली. वैभवने चौथ्या सेटमध्ये पुन्हा दमदार पुनरागमन करत हा सेट 11-8 असा जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली. त्यानंतर निर्णायक सेटही 14-12 असा संघर्षपूर्ण जिंकताना वैभवने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

तत्पूर्वी, उपान्त्य सामन्यात सनतने नववे मानांकन असलेल्या तनय शिंदेचा 11-4, 11-7, 11-9, 11-6 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्‍के केले होते. तर वैभवने तृतीय मानांकन असलेल्या ऋषभ सावंतचा 11-8, 11-6, 11-7, 6-11, 11-9 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.

महिला एकेरीत अग्रमानांकित ईशा जोशीने अकरावे मानांकन असलेल्या वैभवी खेरचा 11-8, 11-7, 11-7, 11-3 असा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच ईशाने सामन्यावर वर्चस्व गाजवताना वैभवीवर दडपण आणले. त्यामुळे वैभवीला अपेक्षित खेळी करण्यात अपयश आल्याने तिने हा सामना एकतर्फी गमावला.

तत्पूर्वी, उपान्त्य सामन्यात वैभवीने दुसरे मानांकन असलेल्या सलोनी शहाचा 11-5, 12-10, 9-11, 13-11, 10-12, 10-12, 13-11 असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्‍के केले होते. तर ईशा जोशीने चौथे मानांकन असलेल्या फौजिया मेहेरअलीचा 11-5, 9-11, 11-5, 11-4, 11-4 असा पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली होती.

तर प्रौढांच्या एकेरीत पाचवे मानांकन असलेल्या अजय कोठावलेने तिसरे मानांकन असलेल्या नितीन मेहेंदळेचा 11-3, 11-5, 11-6 असा सहज पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी उपान्त्य सामन्यात अजयने अग्रमानांकित दीपेश अभ्यंकरचा 11-7, 11-9 10-12, 11-8 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर नितीनने दुसरे मानांकन असलेल्या शेखर काळेचा 16-14, 11-8, 11-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button