breaking-newsराष्ट्रिय

‘टीडीपी’चे सहापैकी चार राज्यसभा सदस्य भाजपमध्ये!

सभापती व्यंकय्या नायडू यांना विलीनीकरणाचे पत्र; राजकीय नाटय़ाने चंद्राबाबू यांना जोरदार धक्का

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची महाआघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणारे तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांना भाजपने गुरुवारी धक्का दिला. ‘टीडीपी’च्या राज्यसभेतील सहापैकी चार खासदारांनी गुरुवारी सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन टीडीपी संसदीय पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याचे पत्र दिले.

राष्ट्रपतींचे अभिभाषण पटलावर ठेवल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर दिल्लीत राजकीय नाटय़ाला सुरुवात झाली. तेलुगू देसमच्या राज्यसभेतील चार खासदारांनी दुपारी २ च्या सुमारास भाजप प्रवेशाचा निर्णय सभापतींना कळवला. सी. एम. रमेश, वाय. सत्यनारायण चौधरी, टी. जी. व्यंकटेश आणि जी. मोहन राव या खासदारांनी पक्षांतर केले. त्यांनी ‘टीडीपी’ संसदीय पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरणाचे पत्रही सभापतींना दिले. या खासदारांनी भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. दोन-तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे या चारही खासदारांवर पक्षांतरबंदीची कारवाई करता येणार नाही.

सर्वाचा विकास करण्याचे भाजपचे धोरण आहे. या खासदारांच्या प्रवेशामुळे आंध्र प्रदेशमध्ये भाजपचा विस्तार करणे शक्य होईल, असे भाजप कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकारांना सांगितले. देशाचा कल कोणाकडे आहे, हे लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले आहे. त्याचा मान राखत आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा खासदार वाय. एस. चौधरी यांनी केला.

राज्यसभेत ‘एनडीए’चे संख्याबळ १०६ वर

राज्यसभेत ‘एनडीए’ अल्पमतात आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत ‘एनडीए’चे संख्याबळ १०२ होते. ‘टीडीपी’च्या चार खासदारांमुळे ते १०६ झाले. वरिष्ठ सभागृहात बहुमत नसल्याने भाजपसाठी महत्त्वाची अनेक विधेयके रखडलेली आहेत. त्यामुळे राज्यसभेतील संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न भाजप सातत्याने करत आहे. ‘एनडीए’ला राज्यसभेत बहुमतासाठी आणखी काही जागा हव्या आहेत.

नड्डा यांना कोणाचा फोन?

पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या अधिकृत पक्ष प्रवेशाची सूचना भाजपकडून पत्रकारांना दिली जाते. गुरुवारी आगाऊ सूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे गुरुवारी भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेचा विषय वेगळाच होता. कार्याध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जे. पी. नड्डा पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधणार होते. पत्रकार परिषद सुरूही झाली. नड्डा संवाद साधतील असे सांगण्यात आले. त्याच वेळी नड्डा यांना फोन आला. फोनवर बोलून ते परत आले आणि पत्रकार परिषदेचा विषयही बदलला. तेलुगू देसमचे खासदार भाजप प्रवेश करणार असल्याचे त्या वेळी जाहीर करण्यात आले. नड्डा पुन्हा कधी तरी पत्रकारांशी स्वतंत्रपणे संवाद साधतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button