breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

झाड पडून दुर्घटना घडल्यास कंत्राटदार जबाबदार

महापालिकेची अट, वृक्षछाटणीसाठी ९० कोटींचा ठेका

पावसाळ्यात झाड किंवा झाडाची फांदी कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई पालिकेने निविदेमध्ये नवीन अट घातली आहे. त्यानुसार पावसाळ्यात अशी एखादी दुर्घटना घडल्यास वृक्ष छाटणी कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात येईल. महापालिकेच्या २४ विभागांमध्ये खासगी आणि सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या छाटणीसाठी प्रशासन २३ कंत्राटदार नेमणार आहे. वृक्ष छाटणीसाठी नव्याने ९० कोटींचे कंत्राट देण्यात येणार आहे. नव्या अटीमुळे येत्या पावसाळ्यात दुर्घटनांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

मृत आणि धोकादायक वृक्ष किंवा फांद्यांच्या छाटणीसाठी पालिकेने २०१६ मध्ये दिलेले कंत्राट १६ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे २४ विभागांतील वृक्षछाटणीसाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. कंत्राटदार नेमण्यासाठी आधी राबवलेली निविदा प्रक्रिया वादात सापडली होती. या कंत्राटदारांना आरबोरिस्ट (वृक्षसंगोपनतज्ज्ञ) नेमण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आमदार सुनील प्रभू यांनी या निविदा प्रक्रियेला विरोध केल्यामुळे प्रशासनाने ही अट काढून नव्याने निविदा प्रक्रिया राबवून २३ कंत्राटदारांची निवड केली आहे. बी आणि सी विभागांसाठी एकच कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत मांडला जाईल.

झाडे कोसळून मृत्यू झाल्यास पालिका त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला एक लाख रुपयाची नुकसानभरपाई देत असते. नव्या निविदेमध्ये मात्र प्रशासनाने कंत्राटदारांसाठी विशेष अटी घातल्या आहेत. पावसाळ्यात झाड किंवा झाडांची फांदी कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला पूर्णत: कंत्राटदार जबाबदार असेल असे यात म्हटले आहे. कंत्राटदारांनी वृक्षतज्ज्ञांच्या सल्ल्याने सर्वेक्षण करून झाड धोकादायक आहे का याची चाचणी करणे आवश्यक आहे, अशीही अट घालण्यात आली आहे. एखादे झाड का धोकादायक ठरले आहे, मृत झाले आहे, त्याची कारणे कंत्राटदाराने देणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षी काय घडले?

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात झाड कोसळून सहा जणांचा मृत्यू, तर ३० नागरिक जखमी झाले होते. गेल्या वर्षी झाडांची छाटणी केल्यानंतरही झाडे कोसळून दुर्घटना घडल्या होत्या. ५०० पेक्षा अधिक झाडे कोसळली होती.

२०१८च्या वृक्ष गणनेनुसार..

  • वृक्षांची संख्या – २९ लाख ७५ हजार २८३
  • खासगी आवारांमध्ये – १५ लाख ६३ हजार ७०१
  • सरकारी जागांवर – ११ लाख २५ हजार १८२
  • रस्त्यांच्या कडेला – १ लाख ८५ हजार ३३३
  • उद्यानांमध्ये – १ लाख १ हजार ६७
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button