breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जेजुरीत सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोटच्या गजरात पौष पौर्णिमा

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोटच्या गजरात पौष पौर्णिमा झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी काल व आज देवदर्शन उरकले; तसेच पौष पौर्णिमेची वारी पूर्ण केली.

कुलदैवत खंडोबादेव बहुजनांचे आराध्य दैवत असल्याने विविध परंपरा, रुढी विविध भागात जोपासल्या जातात. वर्षभरात जेजुरीत वेगवेगळ्या सात ते आठ यात्रा होत असतात. सोमवती अमावस्येव्यतिरिक्त प्रत्येक यात्रेत वेगळी परंपरा असते. अशीच ही पौष पौर्णिमा यात्रा होय.

पौष पौर्णिमा यात्रा खऱ्या अर्थाने भटक्या-विमुक्त जाती जमातींची यात्रा मानली जाते. राज्यभरातून विविध ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट) कोल्हाटी आदी अठरापगड जाती जमातींचे समाजबांधव येथे आले होते. गडकोटात जाऊन भाविक दर्शनरांगेतून देवदर्शन घेत होते. देवदर्शन-कुलधर्म-कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम उरकून आपली वर्षाची वारी उरकत होते. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भातू कोल्हाटी आणि वैदू समाजबांधवांची जातपंचायत भरत असे. मात्र या जातपंचायती वादग्रस्त ठरल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. पंचायती भरल्या नसल्या तरीही या समाजाचे बांधव देवदर्शनासाठी जेजुरीत आलेले आहेत. यात्रेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजारही यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य मानले जाते.

दोन दिवसांच्या बाजारानंतर आलेल्या भाविकांनी गडावर जाऊन आराध्य दैवताचे दर्शन घेतले. वर्षातून एकदा वारी करणाऱ्या या भाविकांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रमही उरकले. ठिकठिकाणी जागरण गोंधळ, तळीभंडार कार्यक्रम उरकले जात होते. मार्तंडदेव संस्थान, जेजुरी नगरपालिका यांनी भाविकांना सोयी-सुविधा पुरवल्या होत्या. जेजुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button