चीनला अमेरिकेचा दणका- चिनी मोबाईलवर अमेरिकेत बंदी?
वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनला दणका देत अमेरिकन राष्ट्रीय दूरसंचार आणि माहिती प्रशासनाने चायना मोबाईलला अमेरिकेत बंदी घालण्याची शिफारस केली आहे. अमेरिका आणि चीन या जगातील दोन मुख्य अर्थव्यवस्थांमधील ट्रेड वार आता टोकाला पोहचले आहे. जगातील सर्वात मोठ्या सेल फोन कंपनीला चायना मोबाईलला अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी लायसन्स न देण्याची शिफारस अमेरिकेच्या राष्ट्रीय दूरसंचार आणि माहिती प्रशासनाने केली आहे.
संघीय संचार आयोगाला पाठवलेल्या एका निवेदनात राष्ट्रीय सुरक्षा धोक्याचा हवाला देत चिनी मोबाईलला अमेरिकेत बंदी घालण्याची शिफारस केली आहे. या बाबतीत अंतिम निर्णय संचार आयोगाने घ्यायचा आहे.
चायना मोबाईलबरोबर झालेल्या विचारविनिमयानंतर अमेरिकेतील बदलते नियम आणि राष्ट्रीय सुरक्षेला वाढलेले धोक्याबाबतची चिंता दूर करता न आल्याने बंदीचा निर्णय सुचवण्यात आलेला आहे. चायना मोबाईलचे सुमारे 90 कोटी ग्राहक आहेत.
वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील वाढत्या तणावाच्या काळात हा निर्णय आलेला आहे. चीनने 50 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन उत्पादनांवर 25 टक्के अतिरिक्त कर लागू करण्याची घोषणा 10 जूनला केली होती, तर अमेरिकेने शुक्रवारी 50 अब्ज किमतीच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे.