चिखलीत सात लाखांचा गांजा जप्त; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक
पिंपरी |महाईन्यूज|
गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चिखली येथे सात लाख रुपये किमतीचा गांजा पकडला. गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल भिमराव पवार (वय 21, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, यमुनानगर, ओटास्किम, निगडी) व अमोल अशोक शिंदे (वय 26, रा. प्रेरणा हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. शनिवारी (ता. 17) दुपारी दीडच्या सुमारास सेक्टर क्रमांक 19 येथे सेवा रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी पवार व शिंदे यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील पोत्यात सात लाख रुपये किमतीचा 27 किलो 500 वजनाचा गांजा सापडला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपये किमतीची दुचाकी व गांजा, असा एकूण सात लाख 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.