breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीत नाल्यांचे मैलायुक्त पाणी शेतात साचले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

  • पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यूचे 23 पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले
  • चिखलीत दुर्गंधीयुक्त पाण्याने डेंग्यूसह साथीचे आजार बळावले

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  वातावरणातील बदलाने पिंपरी-चिंचवडसह सामाविष्ठ गावामध्ये साथीचे आजार वाढले आहेत. शहरातील छोट्या-मोठ्या दवाखान्यांसह महापालिका रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात तापाचे सुमारे 34 हजार 609 रुग्ण आहेत. तर डेग्यू सदृश 255 रुग्ण असून त्यातील 23 जणांचा पाॅझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. तसेच रुग्णांना रक्त, लघवीसह अन्य विविध प्रकारच्या टेस्ट करण्यास भाग पाडल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. दरम्यान, चिखलीत नाल्यांचे मैलायुक्त पाणी अनेकांच्या शेतात तळ्यासारखं साचले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्य विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

उद्योगनगरीसह सामाविष्ठ गावातील चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, च-होली आदी परिसरात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. सध्यस्थितीत ऊन आणि पाऊसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला अशा आजारांनी घेरले आहे. साथीच्या आजारांना हे वातावरण पूरक असल्याने नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जलद गतीने होत आहे. नागरिकांच्या अंगातील प्रतिकारशक्ती कमी असल्याने लहान मुले, अबालवृध्द नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त आहे.

शहरात चिखली, चऱ्होली, जाधववाडी, कुदळवाडी यासह अन्य भागात डेंग्यूची साथ चांगली फैलाव धरत आहे. डेंग्यूने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरत आहे. ताप-थंडीची लक्षणे दिसताच नागरीक रुग्णालयात धाव घेण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे ओपीडी फूल होवू लागली आहे. रुग्णालयात सकाळपासून साथीच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी रांगा लावून थांबत आहेत. रुग्णांना तपासून प्राथमिक उपचार देऊन सोडण्यात येत आहे. त्यातच रुग्णालयात डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने डॉक्‍टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अनेक चाचण्यांनी रुग्णांना झळ
पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यूची साथ वाढत आहे. अनेक भागात ताप-थंडीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी दवाखान्यात अशा रुग्णांची गर्दी होत आहे. त्या रुग्णांना डॉक्‍टरांकडून विविध प्रकारच्या चाचण्या करण्यास सांगितल्या जात आहेत. अनेकदा या चाचण्या आवश्‍यक नसतानाही पॅथॅलॉजी लॅबशी असलेल्या “कनेक्‍शन’मुळे डॉक्‍टरांकडून त्यासाठी आग्रह धरला जातो. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असल्याची तक्रार रुग्ण करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button