breaking-newsराष्ट्रिय

चांगल्या वर्तणुकीमुळे दोषीची फाशी रद्द करून जन्मठेप

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

त्याला सुधारायचे आहे. आपल्याकडून चूक घडल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे त्याने तुरुंगात लिहिलेल्या कवितांमधूनही दिसते, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने रविवारी एका दोषीची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप ठोठावली. न्या. ए. के. सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. ज्ञानेश्वर बोरकर याने अल्पवयीन मुलाच्या खुनाचा गुन्हा केला तेव्हा तो २२ वर्षांचा होता. तो गेली १८ वर्षे तुरुंगात आहे. त्याने तुरुंगात ‘सुसंस्कृत माणूस’ बनण्याचा प्रयत्न केला. तो सुधारू शकतो आणि त्याचे पुनर्वसनही करता येऊ शकते, हे त्याच्या तुरुंगातील वर्तणुकीवरून निदर्शनास आले, असे मत खंडपीठाने नोंदवले. खंडपीठात न्या. एस. अब्दुल नझीर आणि एम. आर. शहा यांचाही समावेश होता.

या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेतल्यानंतर फाशीच्या शिक्षेचे समर्थन करता येत नाही. गुन्ह्य़ाचे गांभीर्य आणि दोषीची तुरुंगातील चांगली वर्तणूक यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा विचार करता आमचे मत आरोपीच्या चांगल्या वर्तणुकीच्या बाजूने झुकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

दोषीविषयी सहानुभूती निर्माण करणारे अनेक घटक आहेत. तुरुंगात लिहिलेल्या कवितांमधून तरुणपणी केलेल्या चुकीबद्दल पश्चात्ताप व्यक्त  करणे हाही त्यातला एक घटक आहे. त्याची ही वर्तणूक तो सुधारण्यास तयार असल्याचे दर्शवते, असेही मत खंडपीठाने नोंदवले. बोरकर याची तुरुंगातील वर्तणूक चांगली होती. त्याने तुरुंगात आपले शिक्षणही पूर्ण केले. त्याने एक सर्वसामान्य नागरिक होण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्याकडून चूक घडली, हे त्याने लिहिलेल्या कवितांमधूनही जाणवते, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला.

या गुन्ह्य़ाचे गांभीर्य आम्हाला मान्य आहे, परंतु मृत्युदंड देण्याएवढा तो दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा या प्रकारात मोडतो, हे मान्य करण्यास आमचे मन तयार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. बोरकर याला पुणे न्यायालयाने एका अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी फाशी ठोठावली होती. या निर्णयाला त्याने मुंबई उच्च न्यायालयात २००६ मध्ये आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयानेही त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button