breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

घाटकोपर विमान अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी बुधवारी यु. व्ही. एव्हीएशन, इंडेमार एव्हीएशन, विमानाचे सुटे भाग पुरवणारा आणि दुर्घटनाग्रस्त विमानाच्या उड्डाणाला प्रतिबंध न करणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.

या वृत्ताला दुजोरा देताना पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी सांगितले, अपघातात मृत झालेल्या मार्या झुबेरी यांचे पती अ‍ॅड. प्रभात कथुरीया यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. झुबेरी या यु. व्ही. एव्हीएशनमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. अपघात घडला तेव्हा त्या वैमानिक आणि तंत्रज्ञांसह विमानात होत्या.

घाटकोपर पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यत दुर्घटनाग्रस्त विमानाचे मालकी हक्क असलेल्या यु. व्ही. एव्हीएशन कंपनीचे दीपक कोठारी, अनील चौहान, विनोद साई, विमानाची डागडुजी करणाऱ्या इंडेमार एव्हीएशन कंपनीचे राजीव गुप्ता, अविनाश भारती, सुटे भाग पुरवणारा अजय अग्रवाल आणि आवश्यक असलेल्या परवानग्या न देता संबंधित विमानाच्या चाचणी उड्डाणाला प्रोत्साहन देणारे अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी २८ जून रोजी घडलेल्या अपघातात मार्या यांच्यासह वैमानिक  राजपूत, अभियंत्या सुरभी गुप्ता, तंत्रज्ञ मनीष पांडे, पादचारी गोविंद दुबे यांचा मृत्यू झाला. तर दोन पादचारी जखमी झाले होते.

तक्रारदार कथुरिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार या अपघाताची ‘स्टॅण्डींग कमिटी ऑन लेबर’ या समितीने चौकशी केली. समितीने लोकसभा सचिवालयाला सादर केलेला अहवाल आणि अन्य स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त व्हीटी-युपीझेड विमान २०१४मध्ये उत्तरप्रदेश सरकारने भंगार म्हणून विक्रीस काढले. तत्पुर्वी २००८मध्ये या विमानाचा अपघात घडला होता. त्यानंतर या विमानाने एकही उड्डाण घेतले नव्हते. हे विमान सील्व्हर ज्युबिली कंपनीने २०१४मध्ये विकत घेतले आणि डागडुजीसाठी इंडेमार एव्हीएशनकडे दिले. डागडुजी पूर्ण होण्याआधीच हे विमान सदर कंपनीने यु. व्ही. एव्हीएशनला विकले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button