breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीलेख

घरगुती उपायांचा अति वापरही ठरू शकतो त्वचेसाठी हानिकारक

घरच्या घरी इंटरनेटवर बघून त्वचेची काळजी घेणारे पॅक आपण बनवतो. कधी कधी त्याचा फायदा होण्यापेक्षा त्यांच्यामुळे नुकसानही होत. चेहऱ्यावर पुरळ येणं, त्वचा कोरडी पडणं, खाज येणं यांसारख्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचंही प्रमाण वाढलं आहे.पाहुयात त्यासाठी काय करू नये.

  • त्वचेचं खूप जास्त प्रमाणात क्लिनसिंग करणं, फेसमास्कचा अतिवापर यासारख्या कारणांमुळे त्वचेच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे.
  • घरगुती उपायांचा अति वापर केल्यास तेदेखील त्वचेसाठी हानिकारक ठरत आहे. घरच्या घरी तयार केलेल्या स्क्रब आणि पॅकच्या वापरामुळे त्वचेवर पुरळ येणं, चट्टे येणं यासारखे त्रास उद्भवल्याचं काही रुग्ण सांगतात.

उपायांचं नको मिश्रण

ज्या व्यक्ती नियमितपणे सलूनमध्ये जात होत्या त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी आता फ्रूट फेशिअल, लिंबू-मध याचे मास्क, मुलतानी माती यांसारख्या उपायांचा अवलंब करताना दिसत आहेत. तर काहींनी घरच्या घरीच रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करायला सुरुवात केली आहे. पण, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करणं तुमच्या त्वचेसाठी घातक ठरू शकतं. तसंच त्यामुळे तुमच्या त्वचेचं कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते.

​ब्युटी प्रोडक्टचा अतिवापर टाळावा

तुमच्या त्वचेचा समतोल राखणं गरजेचं असतं. त्वचेवर सौंदर्यप्रसाधनांचं थर चढवणं किंवा त्वचेची अजिबात काळजी न घेणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जर तुमच्या त्वचेला अ‍ॅलर्जी होत असेल, तर ते सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे किंवा त्वचेची काळजी घेण्यासाठी केलेल्या उपयांच्या मिश्रणामुळे होऊ शकतं. जर तुम्ही एकाच वेळी वेगवेगळे उपाय चुकीच्या पद्धतीने करत असाल, तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे.

​ब्युटी प्रोडक्ट वापरताना…

जर एखादी व्यक्ती ग्लायकोलीक अ‍ॅसिड, मॅनडेलीक अ‍ॅसिड, सॅलीसिलिक अ‍ॅसिड आणि रेटिनॉल यांचा समावेश असलेला फेसवॉश वापरत असेल तर त्याने याच रसायनांचा समावेश असलेले स्क्रब, टोनर, सिरमचा वापर करणं टाळावं.

  • तेलयुक्त उत्पादनांवर पाणीयुक्त उत्पादनं वापरू नयेत. तसंच ग्लायकोलीक अ‍ॅसिड आणि सनस्क्रीनचा एकत्रित वापर टाळावा.

चेहऱ्यावर मुरुम असल्यास…

  • ज्या व्यक्तींची त्वचा कोरडी आहे आणि ज्यांच्या त्वचेवर पुरळ आहे अशा व्यक्तींनी फळांचे रस, लिंबाचा रस, बटाटा-टोमॅटो हे पदार्थ त्वचेवर लावण्यासाठी वापरू नयेत. तसंच क्रीम आणि दुधाचादेखील अतिरेक टाळावा. व्हिनेगरचा वापर केल्यास त्वचेचं नुकसान होऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात.
  • घरगुती उपाय विचारपूर्वकच

घरगुती उपाय करण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, त्वचेची नेमकी गरज काय यांचा विचार करून मग त्वचेच्या पोषणासाठी कोणत्या घटकांचा वापर करायचा, ते निश्चित करा. दही, मध, ओट्स, हळद, दूध हे पदार्थ सौम्य मानले जातात आणि मर्यादित प्रमाणात वापरणं त्वचेसाठी योग्य मानलं जातं.

  • बटाटा, टोमॅटो, लिंबाचा रस यांसारखे पदार्थ त्वचा कोरडी करतात. तेलकट त्वचेवर साय किंवा तेल लावल्याने त्वचेवरील छिद्रं बंद होऊ शकतात, असं त्वचारोग तज्ज्ञ सांगतात.

प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार असतो वेगळा

जर एखादा पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अ‍ॅलर्जी झाली असेल तर तो पदार्थ त्वचेवर लावणं योग्य ठरणार नाही. जुनी, एक्सपायरी डेट उलटून गेलेली, व्यवस्थित न झाकलेली सौंदर्यप्रसाधनं वापरणं टाळा.

  • कोणतंही मिश्रण तयार करण्यासाठी नेहमी स्वच्छ भांडं आणि चमच्याचा वापर करा.
  • दोन व्यक्तींची त्वचा ही सारखी नसते. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीच्या त्वचेसाठी जे फायदेशीर असेल, ते तुमच्या त्वचेसाठीसुद्धा फायदेशीर असेलच असं नाही. त्यामुळे घरगुती उपाय करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर पुरळ किंवा इतर अ‍ॅलर्जीची लक्षणं आहेत, अशा व्यक्तींनी घरगुती उपाय करणं टाळावं.

​नवीन उत्पादन वापरताय का?

जर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी नवीन प्रॉडक्ट वापरायला सुरुवात करणार असाल, तर आधी ते कमी प्रमाणात वापरा. तुमच्या त्वचेला त्याची सवय होऊ द्या.
कानाच्या मागे किंवा मानेवर पॅच टेस्ट करायला विसरू नका. घरगुती उपचारांनासुद्धा ही कृती लागू पडते.
त्वचेवरील छिद्रं बंद करणाऱ्या उत्पादनांपासून लांब राहा.
सल्फेट्स, पॅराबेन्स आणि कृत्रिम सुगंध असलेली उत्पादनं वापरणं टाळा.
जर तुम्हाला तुमच्या त्वचेचा प्रकार माहीत नसेल तर त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकता आणि तुमच्या त्वचेला अनुकूल असलेले घटक जाणून घ्या.

त्वचेला त्रास होत असल्यास त्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये काय बदल करावेत, हे तज्ज्ञांकडून जाणून घेता येईल.

  • सौंदर्यप्रसाधनांची संख्या कमी करून तुम्ही तुमचं स्कीन केअर रुटीन सोपं करू शकता. जर तुमची त्वचा अचानकपणे तेलकट झाली असेल तर लगेच तेलकटपणा कमी करण्यासाठी विशिष्ट प्रोडक्ट वापरायला सुरुवात करू नका. तुमच्या त्वचेला हानिकारक ठरत असलेलं प्रोडक्ट वापरायचं थांबवा आणि मगच त्याला पर्यायी प्रोडक्ट वापरायला सुरुवात करा. यासाठी डॉक्टरचा सल्ला घ्या.

​त्वचेला खाज येत असल्यास…

सौंदर्यप्रसाधनांच्या सततच्या वापरामुळे तुमच्या त्वचेला थोड्या प्रमाणात खाज येऊ शकते. अशा वेळी ते वापरण्यापासून ब्रेक घेता येईल. अशा वेळी न्यूट्रल फेसवॉश आणि मॉइश्चरायजिंग क्रीम वापरू शकता. जर त्वचेची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली असेल, तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

​त्वचेवर होणारे दुष्परिणाम माहीत आहेत?

कोको बटरमुळे त्वचेवरील छिद्रं बंद होऊ शकतात.
ग्लिसरीन वापरल्याने त्वचेतील ओलावा कमी होण्याची शक्यता असते.
बेकिंग सोड्याचा बेसिक पीएच जास्त असतो. त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
कोरफडीचा अर्क योग्य पद्धतीने न काढल्यास त्वचेला खाज येऊ शकते.
आम्लयुक्त फळं आणि भाज्यांचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होऊ शकते.
संकलन- राहुल पोखरकर, ए. पी. शाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button