breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार

मुंबई – राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे ८ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची दिलासादायक माहितीही यावेळी त्यांनी दिला ICMR च्या प्रोटोकॉलचं आपण सक्तीने पालन करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी यावेळी जनतेने जागरुक राहावं, घाबरण्याचं कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असं आवाहन केलं. “व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.“राज्यात सध्या आठच रुग्ण असून त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोणी पॉझिटिव्ह आढळला तरी करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालाय का हे आधी तपासावं लागेल,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत. ८ तारखेला प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वैगेरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का? याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

“महाराष्ट्रात सध्या दिवसाला दोन ते अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. आधी दिवसाला २१ हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. मृत्यूदरदेखील कमी झाला आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासंबंधी नियमावली करण्यात आली होती. सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइनची सक्ती करण्यात आली होती. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घऱात क्वारंटाइन होण्यास सांगितलं होतं. राज्याने काळजी घेण्यामध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“केंद्राला आपण इतर राज्यांनाही ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांबद्दल नियमावली तयार करण्यास सांगणार आहोत. जेणेकरुन ते रुग्ण त्या राज्यांमधून महाराष्ट्रात येऊ नयेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात पत्र लिहिणार आहेत असंही यावेळी त्यांनी सांगितलं.मुंबई लोकल, नाईट कर्फ्यू यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. “लसीकरणासाठी यादी काढण्याचा आदेश जिल्ह्यांना दिला आहे. यामध्ये मुख्यत्वे आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि इतरांचा समावेश असेल. अंदाजे तीन कोटी लोकांना लस मिळेल असा अंदाज आहे. दारिद्र्यरेषेच्या खाली असणाऱ्यांना मोफत लस दिली पाहिजे असा आग्रह आपण केंद्राकडे करणार,” असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

“गरिबांना लसीसाठी खर्च करायला लावणं योग्य नाही. तो खर्च केंद्राने करावा अशी विनंती आम्ही केंद्राकडे करणार आहोत. जर केंद्राने नाहीच केला जर राज्य शासनाच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. राज्याच्या अख्त्यारित असणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही,” असं आश्वासन राजेश टोपे यांनी दिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button