‘केवळ ‘अंधभक्त’च नाही, तर भाजपा खासदारही अशी तुलना करतात’ – राष्ट्रवादी
मुंबई | महाईन्यूज
‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात गदारोळ माजलेला होता. या पुस्तकाच्या लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली होती. त्यानंतर, महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि शिवभक्तांकडून लेखक गोयल यांचा निषेध नोंदविण्यात आला होता. मात्र, आता, भाजपाच्या एका खासदाराने अमित शहांची तुलना चक्क सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केलेली आहे.
भाजपाखासदार तेजस्वी सूर्या यांनी गृहमंत्री अमित शहांना एक पेटींग फोटो भेट दिलेला आहे. त्यामध्ये, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आणि अमित शहांचा अर्धा-अर्धा फोटो दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. ”युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शहा यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुयायी खासदारांकडूनही होत आहे”, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक पेसजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या या निषेध पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.