breaking-newsआंतरराष्टीय

कारपासून बुलेट ट्रेनच्या निर्मितीमध्ये भारत-जपान सहकार्य

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

कोबे : कारचे उत्पादन करण्यापासून ते बुलेट ट्रेनचे उत्पादन करण्यासाठी एकत्र येण्यापर्यंत भारत व जपान यांनी सहकार्य केल्यापासून या दोन देशांमधील संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

जपानने भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मोदी यांनी जपानच्या कोबे शहरातील भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले.

भारताच्या जगाशी असलेल्या संबंधांचा मुद्दा येतो, तेव्हा जपानचे स्थान महत्त्वाचे ठरते. हे संबंध आजचे नसून अनेक शतकांपासूनचे आहेत. या संबंधांचा पाया एकमेकांच्या संस्कृतीबाबत सामंजस्य आणि आदर हा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

येत्या पाच वर्षांमध्ये ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे, द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होणार आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

एक काळ असा होता, की आम्ही मोटारी तयार करण्यात सहयोग करत होतो आणि आज आम्ही बुलेट ट्रेन तयार करण्यात सहयोग करत आहोत, असे ओसाका येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले पंतप्रधान म्हणाले.

आज भारताचा असा कुठलाही भाग नाही, जेथे जपानचे प्रकल्प किंवा गुंतवणूक यांनी आपला ठसा उमटवलेला नाही. त्याचप्रमाणे, भारताची बुद्धिमत्ता आणि मनुष्यबळ हे जपानला बळकट करण्यात आपले योगदान देत आहेत, असे ह्य़ोगो पर्फेक्चुअर गेस्ट हाऊसमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जमलेल्या उत्साही भारतीयांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button