breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काँग्रेसची निदर्शने : देशातील स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा मोदींचा डाव – सत्यजित तांबे

  • आकुर्डीतील सीबीआय कार्यालयासमोर शहर काँग्रेसची निदर्शने

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – केंद्रात सत्तांतर झाले तेव्हापासून मोदी-शहा या जोडगोळीने हुकूमशाही पध्दतीने कारभार चालवला आहे. संविधानाचा अवमान करीत देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषय विभाग (सीबीआय) यासारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव आखला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्‍यजित तांबे यांनी पिंपरीत केला.

‘राफेल’ भ्रष्टाचाराची चौकशी करणारे सीबीआयचे संचालक आलोक वर्मा, विशेष संचालक राकेश आस्थाना या अधिका-यांवर पंतप्रधान मोदींनी घटनेची पायमल्‍ली करत हुकूमशाही पध्दतीने कारवाई केली. त्‍या विरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्‍हा कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. 26) आकुर्डी येथील सीबीआय कार्यालयासमोर पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्‍वाखाली निदर्शने करण्यात आली. त्‍यावेळी तांबे बोलत होते. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, शहर महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, बिंदू तिवारी, प्रदेश सरचिटणीस अनिकेत म्‍हात्रे, मयुर जयस्वाल, गणेश जाधव, प्रशांत ओगले, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अल्‍पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, हरिदास नायर, माजी नगरसेविका विद्या नवले आदी उपस्थित होते.

तांबे म्‍हणाले की, राफेल विमान खरेदीमध्ये एचएएल या कंपनीला डावलून उद्योगपती अंबानींना कंत्राट देण्यात आले. यामध्ये 40 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्‍याची चौकशी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्‍येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी सीबीआयचे वर्मा यांच्याकडे केली होती. त्‍यासंदर्भात वर्मा यांनी महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे जमा केली होती. परंतु, आपला घोटाळा जनतेसमोर येईल व पितळ उघडे पडेल याची भीती चौकीदारांना होती. म्‍हणूनच घटनेचा अनादर करीत एका रात्रीत वर्मा आणि आस्थाना यांची बेकायदा बदली करण्यात आली. घटनेनुसार या संचालकांची बदली करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची बैठक होऊन निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु, हे सर्व कायदेशीर संकेत धुडकावून मोदींनी हुकूमशाही पध्दतीने बदली केली, असे तांबे यांनी सांगितले.

सचिन साठे म्‍हणाले की, राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी राफेल खरेदी तसेच या प्रकरणात मोदी-शहांनी केलेल्‍या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. तसेच, सीबीआयचे वर्मा, आस्थाना यांच्यावर बेकायदापणे कारवाई करताना घटना पायदळी तुडवली, हे जनतेसमोर आणले आहे. साडेचार वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी हुकूमशाही पध्दतीने देशाला वेठीस धरले आहे. त्‍यांच्या दबावामुळेच सर्वोच्च न्यायाधीशांनादेखील माध्यमांसमोर न्याय मागण्याची घटना देशात प्रथमच घडली होती. निष्पक्षपातीपणे काम करणा-या सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेवरदेखील आपला अंकुश पाहिजे, या हेतूने चौकीदारांनी सर्वोच्च अधिका-यांच्या बदल्‍या केल्‍या. त्‍यामुळे जगात भारताची प्रतिमा मलीन झाली. सुज्ञ नागरिक यांच्या कारभाराला कंटाळली असून येत्या निवडणुकीत भाजपाची सत्ता उलथून टाकली जाईल, असा विश्वास साठे यांनी व्यक्‍त केला. यावेळी गली गली में शोर है, चौकीदार चोर है, मोदी, शहा, भाजपा सरकार हाय हायच्या घोषणा देण्यात आल्‍या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button