breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

काँग्रेसचा गोंधळ अजून संपेना

पुणे, उत्तर मुंबईचा उमेदवार ठरेना, सांगलीचा घोळही कायम

लोकसभा निवडणुकीच्या आखाडय़ात प्रचाराच्या माध्यमातून विरोधकांशी भिडण्याची वेळ आली, तरी काँग्रेस पक्षाच्या तीन मतदारसंघांचा आणि उमेदवांचा घोळ संपेना. पुणे आणि उत्तर मुंबई मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार ठरेनात, तर सांगली मतदारसंघासह उमेदवार कोण याचाही घोळ अजून कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य मित्र पक्षांबरोबर जागावाटपत मिळालेल्या मतदारसंघातील उमेदवार ठरविण्याबाबत शेवटच्या दिवसापर्यंत गोंधळ व घोळ निर्माण करुन ठेवणे, ही काँग्रेसची जुनीच परंपरा आहे. परंतु सत्तेवर असताना असा गोंधळ नंतर सहजपणे मिटवला जात होता, परंतु आता विरोधी पक्षात असल्याने आणि समोर सत्ताधारी भाजप-शिवसेनेसारखा तगडा विरोधक असताना, अंतर्गत वाद मिटविण्यात काँग्रेसची अधिक शक्ती खर्च होत असल्याचे बोलले जाते.

उत्तर मुंबई मतदारसंघात २००४ व २००९ असा दोन वेळा विजय मिळवूनही केवळ मागील निवडणुकीत पराभव झाला म्हणून या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे कुणी निवडणूकच लढवायला तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीसाठी कधी शिल्पा शिंदे, आसावरी जोशी तर आता उर्मिला मातोंडकर या सिनेतारकांच्या  नावांची चर्चा सुरु झाली आहे. प्रत्यक्ष पक्षाने अजून अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

पुणे मतदारसंघातील उमेदवाराबाबतही अशीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी उद्योजक संजय काकडे यांच्यासाठी काँग्रेसने गळ टाकला होता. परंतु पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध केल्याने काकडे यांना भाजप उमेदवाराच्या विरोधात रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न फोल ठरला. आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. चव्हाण यांनी पुण्यातून लढावे, असा काँगा्रेसमधून आग्रह असल्याचे समजते. परंतु त्याबाबतही अजून काही अंतिम निर्णय झालेला नाही.

सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. मागील निवडणुकीत  संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन या मतदारसंघातून विजय मिळविला. त्यामुळे एका पराभवाने काँग्रेस खचून गेली आहे. वसंत दादा पाटील घरण्यातच उमेदवारीवरुन वाद धुमसत आहे. तर दादा घराण्याच्या बाहेर उमेदवारी दिली तर, गटबाजी उफाळून येईल व त्याचा फटका पक्षाच्या उमेदवाराला बसेल, अशी भिती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसमधील उमेदवारासह खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यावा, असा प्रस्ताव पुढे आला. मात्र त्यालाही काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार की मित्र पक्षाला सोडणार आणि उमेदवार कोण असणार, हा घोळ  सुरुच आहे.

सतेज पाटील-शेट्टी चर्चा

सांगली मतदारसंघ उमेदवारावरुन निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. येत्या दोन दिवसांत हा पेच सुटेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button