breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कर्करोग उच्चाटनाच्या दिशेने एक पाऊल..

रोगनिर्मिती करणारा नवा घटक शोधण्यात राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राला यश

पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग हा आजार होतो, याबाबतचे संशोधन आतापर्यंत समोर आले आहे. मात्र आजपर्यंत ज्ञात असलेल्या कर्कजनुकांपेक्षा वेगळ्या आणि किती तरी अधिक आव्हानात्मक तसेच गंभीर घटक शोधण्यात राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्यामुळे कर्करोग उच्चाटनासाठी हे पुढचे पाऊल मानले जात आहे.

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातर्फे (नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स) मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत या संशोधनाविषयीची माहिती देण्यात आली.

संस्थेच्या ज्येष्ठ संशोधक डॉ. शिरास म्हणाल्या, की जिनीर नावाच्या घटकाचा शोध लावण्यात आला आहे. कर्करोगाच्या गाठीच्या निर्मितीचा अभ्यास हा विविध मानवी पेशींच्या जवळ जाणाऱ्या प्रणालींचा वापर करून केला जातो. उंदरांच्या पेशींवर प्रयोग करून करण्यात आलेल्या संशोधनातून कर्करोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जिनीरच्या पेशींमधील भूमिकेचा अभ्यास यशस्वी झाला आहे, त्यामुळे त्याचा मानवावरील संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सीईपी ११२ या पेशीकेंद्रकातील प्रथिनांशी जिनीर घटकाची होणारी आंतरक्रिया आणि संवाद या संशोधनाच्या निमित्ताने प्रथमच अभ्यासण्यात आला.

डॉ. वर्षां शेपाळ म्हणाल्या, जगभरातील शास्त्रज्ञ कर्करोगाबाबत सखोल संशोधन करत आहेत, मात्र जिनीर हा ‘नॉन कोडिंग आरएनए’ शोधून काढण्यात आम्हाला मिळालेले यश उत्साह वाढवणारे आहे. जिनीर घटकाच्या अपारंपरिक स्वरूपामुळे आम्ही केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांकडे अनेकदा संशयाने पाहिले गेले, मात्र दहा वर्षांहून अधिक काळ केलेल्या अथक संशोधनामुळे जिनीर हा वेगळ्या पद्धतीने काम करणारा घटक असून अशा प्रकारच्या ‘नॉन कोडिंग आरएनए’मुळे पेशींमध्ये कर्करोग निर्माण होऊ शकतो हे सिद्ध केले. कर्करोगाच्या निर्मितीतील जिनीर या घटकाची नेमकी भूमिका स्पष्ट झाल्यास भविष्यात कर्करोगाचे व्यवस्थापन आणि उपचारांना नवीन आयाम लाभणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राच्या डॉ. अंजली शिरास आणि टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे डॉ. एल. सी. पाध्ये यांनी जिनीर घटकामार्फत होणारी कर्करोगनिर्मिती या विषयावर संशोधन केले आहे. डॉ. पाध्ये सध्या केआयआयटी भुवनेश्वर येथे कार्यरत आहेत. या संशोधनावर आधारित शोधनिबंध ‘प्लॉस बायॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शोध नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

संशोधनाचा लाभ..

* शास्त्रज्ञांनी या नवीन घटकाचे नामकरण ‘जिनीर’ असे केले आहे. कर्कजनुकांपासून कर्कप्रथिनांची निर्मिती न करता पेशींमध्ये असमतोल निर्माण करण्याचे काम हा घटक करतो.

* त्यामुळे होणाऱ्या अनैसर्गिक बदलांमुळे कर्करोगाची निर्मिती होत असल्याच्या निष्कर्षांपर्यंत शास्त्रज्ञ येऊन पोहोचले आहेत.

* प्रथिनांशी जिनीर घटकासोबत होणारी आंतरक्रिया शोधून काढण्यात आल्याने आता त्याचा फायदा कर्करोगावर मात करण्यासाठी होऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button