एका पाकिस्तानीसह जैशच्या दोन दहशतवाद्यांचा खातमा
शोपियॉंमध्ये चकमक : सुरक्षा दलांबरोबर संघर्षात एका नागरिकाचा मृत्यू, 20 जखमी
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील चकमकीत आज सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. ते पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, चकमकीवेळी स्थानिक नागरिकांच्या गटात आणि सुरक्षा जवानांमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये एक नागरिक मृत्युमुखी पडला, तर 20 जण जखमी झाले.
शोपियॉं जिल्ह्यातील कुंडल्लन भागात काही दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर विविध दलांच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांच्या शोधासाठी धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेवेळी सुरक्षा पथकाने दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या घराला वेढले. सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. त्या चकमकीत घरात दबा धरून बसलेले दोन्ही दहशतवादी ठार झाले.
समीर अहमद शेख आणि बाबर अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. बाबर हा पाकिस्तानी नागरिक होता. तो शोपियॉं परिसरातील जैशचा म्होरक्या होता. त्यामुळे त्याचा खातमा हा जैशसाठी मोठा हादरा मानला जात आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांना पलायन करता यावे यासाठी चकमकीत अडथळा आणण्याच्या उद्देशातून स्थानिक नागरिकांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर दगडफेक सुरू केली. त्यांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांना बळाचा वापर करावा लागला. त्या संघर्षात 20 नागरिक जखमी झाले. त्यातील एकाचे नंतर निधन झाले. चकमकीवेळी क्रॉस-फायरिंगमध्ये सापडूून तो जखमी झाल्याचे सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले.