breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एअर इंडियाच्या सेवेतील पहिले ‘फ्लाइट सिम्युलेटर’ आता प्रदर्शनात

कार्याविषयी विद्यार्थी, नागरिकांमध्ये जागृती करणार; ‘एव्हिएशन गॅलरी’ उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा करार

एअर इंडियाचे पहिलेवहिले ‘फ्लाइट सिम्युलेटर’ आता सेवेतून निवृत्त झाले असून ते नेहरू विज्ञान केंद्रात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. ‘बोइंग ७४७-२००’ असे या सिम्युलेटरचे नाव आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पश्चिम प्रदेशचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते झाले.

वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘फ्लाइट सिम्युलेटर’चा वापर होतो. विमानाने आकाशात उड्डाण केल्यानंतर त्याच्या आत जशी स्थिती असते तशी स्थिती सिम्युलेटरमध्ये निर्माण केलेली असते.

त्यामुळे प्रशिक्षणार्थी वैमानिकाला खरे विमान चालवल्याचा आभास होतो. तसेच या वेळी काही चूक झाल्यास अपघात होत नाही व चूक सुधारण्याची संधी वैमानिकाला मिळते.

विमान आकाशात असताना कोणत्या दिशेला कधी वळवायचे, उड्डाण कसे करायचे, जमिनीवर कसे उतरवायचे यासंबंधी संपूर्ण प्रशिक्षण ‘सिम्युलेटर’मध्ये दिले जाते. यामुळे विमान चालवताना उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यांची कल्पना वैमानिकाला येते. त्यानुसार आपत्कालीन प्रशिक्षण दिले जाते.

‘फ्लाइट सिम्युलेटर’च्या कार्याविषयी विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता यावी या हेतूने ते प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

त्याच्या आजूबाजूला सिम्युलेटरचा इतिहास छायाचित्रांसहित दाखवला आहे. शिवाय चित्रफितींच्या माध्यमातून ‘फ्लाइट सिम्युलेटर’च्या प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली जाते. यानिमित्ताने ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण’ आणि ‘राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद’ यांच्यात एव्हिएशन गॅलरी उभारण्यासाठी २ कोटींचा करार झाला आहे.

१९८० पासून सेवेत

सध्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले ‘बोइंग ७४७-२००’ सिम्युलेटरची निर्मिती कॅनडाच्या ‘कॅनेडियन एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या कंपनीने केली आहे. १९८० साली ते एअर इंडियाच्या ताब्यात आले आणि त्यानंतर २१ वर्षे सेवेत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button