breaking-newsआंतरराष्टीय

इस्त्रायलमधील निवडणूक जिंकण्यासाठी नेतान्याहू घेणार मोदींची भेट

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू ९ सप्टेंबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेतान्याहून दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी इस्त्रायलमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. मोदी यांची भेट नेतान्याहू यांच्या फायद्याची ठरु शकते असं मानलं जात आहे. प्राचाराचा भाग म्हणूनच ही भेट होत असल्याची टिका नेतान्याहू यांचे विरोधक करत आहे.

‘नेतान्याहू यांची ही भारत भेट अवघ्या काही तासांची असेल. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. या भेटीत कोणतीही महत्वाची बैठक दोन्ही देशांमध्ये होणार नसून भविष्यातील व्यापारसंबंधी बैठकींसंदर्भात या बैठकीत एखादा निर्णय होऊ शकतो,’ अशी माहिती सुत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. इस्त्रायलमधील निवडणुकांआधी प्रचाराचा भाग म्हणून नेतान्याहू मोदींना भेटणार असल्याचा अंदाज काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इस्त्रायलमधील हारातझ या वृत्तपत्रातील स्तंभलेखक यॉसी व्हेटर यांनी नेतान्याहू यांची ही भेट केवळ जाहिरातीसाठी असल्याची टिका आपल्या लेखातून केली आहे. ‘नशीब नेतान्याहू यांच्या सोबत नाही. नेतान्याहू मोदींची भेट घेतील, काही फोटो काढतील आणि त्याचा वापर आपल्या प्रचारासाठी करतील. ही बैठक इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाची होती असंही सांगितलं जाईल,’ असं यॉसी यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर जेरुसलेममधील भारतीय दुतावासाला नेतान्याहू यांनी पत्र पाठवून आपल्याला भारतात येण्याचे आमंत्रण द्यावे अशी विनंती केल्याचेही यॉसी यांनी म्हटलं आहे. सुत्रांच्या महितीनुसार भारताने २५ ऑगस्टच्या आठवड्यात मोदी आणि नेतान्याहू भेटीसंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. मात्र इस्त्रायल सरकारने ही भेट लवकर घडवून आणण्याची विनंती केल्याने अखेर ९ ऑगस्ट रोजी ही भेट होणार आहे. याआधी नेतान्याहू यांनी जानेवारी २०१८ रोजी भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर मोदींनी २०१७ साली तेल अविवला भेट दिली होती.

नेतान्याहू यांच्यासमोर राजकीय संकट

सर्वाधिक काळ इस्त्रायलचे पंतप्रधानपद भूषणवण्याचा विक्रम २० जुलै रोजी नेतान्याहू यांच्या नावे झाला आहे. त्यांनी इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुर्रियॉन यांचा विक्रम मोडीत काढला आहे. असे असतानाही इस्त्रायलमध्ये त्यांना होणारा विरोध वाढताना दिसत आहे. म्हणूनच एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रीय निवडणुकीमध्ये चांगली मते मिळूनही इतर पक्षांना एकत्र घेऊन आघाडी सरकार स्थापन करण्यात नेतान्याहू यांना अपयश आले आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा इस्त्रायलमध्ये निवडणुका होणार आहेत.

एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला ३५ जागा मिळाल्या आहेत. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी बेनी गांत्झ यांच्या ब्लू अँड व्हाइट पक्षालाही तितक्याच जागा मिळाल्या. मात्र इस्रायली संसदेत बहुमतासाठी आवश्यक जागांची जुळणी करण्यासाठी त्यांना आणखी काही पक्षांची साथ मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र नेतान्याहून यांनी आघाडी सरकारची मोट बांधता आली नाही. त्यामुळेच आता पुन्हा एकदा देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

नेतान्याहू यांच्यासाठी यंदाची तेथील सार्वत्रिक निवडणूक खूपच कष्टप्रद ठरली. यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे बेंजामिन यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. लाचखोरीच्या तीन प्रकरणात त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल होऊ शकते. आपण काहीही गैर केलेले नाही असा नेतान्याहू यांचा दावा आहे. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यास नेतान्याहू यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणात खटला चालवला जाऊ शकतो असं मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button