breaking-newsमहाराष्ट्र

आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत – अजित पवार

“महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचं वेगळं लक्ष असतं. या निवडणुकांना सामोरं जात असताना लोकांच्या मनात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ईव्हीएम विरोधात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनीही ईव्हीएमवर भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपलं मत मांडलं.

“मागच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा अशा प्रकारची मागणी केली होती. अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, ही कुण्या एका राजकीय पक्षाची नव्हे. संपूर्ण जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

“देशात अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. भाजपाने जो अंदाज व्यक्त केला तसा निकाल लागला. अनेकांनी याबाबत ईव्हीएम मशीनवर निवडणूक होऊ नये अशी भूमिका व्यक्त केली परंतु हे अमान्य करण्यात आले. आता या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे यासाठी सगळेच पक्ष एकत्र आले आहेत”, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

“देशात पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे. अशा व्यवस्थेवर सगळयांना शंका आहेत. त्यात हे लोक अंदाज व्यक्त करतात आणि तितक्या जागा येतात हे अजब आहे. आता देशात संभ्रमाचे वातावण निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे”, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळदेखील उपस्थित होते. “अनेकांनी ईव्हीएम मशीनवर होणाऱ्या निवडणूकांवर अविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी हा लढा सुरू केला आहे. या लढ्यात सर्वांनी सामील व्हावे”, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केले. “अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले आहे तरीदेखील आपल्याला हे का हवे आहे?”, असा सवालही छगन भुजबळ यांनी विचारला. “निवडणुकीवर सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे यासाठी सरकारला गदगदा हलवण्याची गरज आहे”, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button